📰 MUMBAI MITRA ANALYSE
——-
◆ महायुतीची ‘रसद’ पोहचलीच नाही?
◆ कार्यकर्त्यांची नारजी भोवली; मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा झाला अपेक्षाभंग
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. याबाबत कारणमीमांसा राजकीय तज्ञ करत असतानाच ‘दै.मुंबई मित्र’ने कार्यकर्त्यांमधून कानोसा घेतला असता एक वेगळेच धक्कादायक कारण पुढे आले आहे. पक्षांनी निवडणुकीसाठी भरघोस ‘रसद’ पाठवली असतानाही तळागाळातील विशेषतः मित्रपक्षातील कार्यकर्त्यांपर्यंत ही ‘रसद’ पुरेशी प्रमाणात पोह्चलीच नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होऊन त्यांनी म्हणावे तसे काम केले नसल्याचे कार्यकर्त्यांकडून केळते. पक्षाची ‘रसद’ गेली कुठे? अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
मुंबई व उपनगरामध्ये एकूण सहा लोकसभाच्या जागा महायुतीने लढवल्या. या सहा जागांपैकी किमान पाच जागा महायुती पटकावेल किंबहुना तसे अनुकूल वातावरण महायुतीला दिसत होते.परंतु प्रत्यक्षात महायुतीच्या पदरात केवळ दोनच जागा पडल्या. हा महायुतीसाठी मोठा सेटबॅक मानला जातो. याबाबत विविध राजकीय तज्ञाकडून कारणमीमांसा केली जातं आहे.
या पार्श्ववभूमीवर ‘दै. मुंबई मित्र’ ने महायुतीमधील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता एक वेगळेच धक्कादायक कारण पुढे आले आहे.अनेक कार्यकर्त्यांनी आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
कार्यकर्त्यांच्या मते महायुतीमध्ये सामील असलेल्या सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी बऱ्यापैकी ‘रसद’ पाठवली होती. परंतु ऐन निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. बऱ्याच कार्यकर्त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत केवळ झुलवून ठेवण्यात आले. काही कार्यकर्त्यांपर्यंत अल्पशी ‘रसद’ पोहचली. अशा परिस्थितीत काम कसे करायचे? आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना कसे सांभाळायचे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. काही ठिकाणी तर सहकाऱ्यांच्या चहापाण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना जास्त झळ सोसावी लागली. यामध्ये मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना जास्त झळ लागली. त्यामुळे नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांनी म्हणावे तसे निवडणूक प्रचारात स्वतःला झोकून दिले नाही. केवळ दिखाव्याचा प्रचार केला. यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा धक्का सहन करावा लागला, असे बोलले जाते.
आपआपल्या पक्षाकडून बऱ्यापैकी ‘रसद’ प्रत्येक विभागावर पोहचल्याचे तळागाळातील कार्यकर्त्यांना कळले होते, मात्र ही “रसद“ कुठे गायब झाली? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. याबाबत महायुतीमध्ये सामील असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी चौकशी करावी असे अनेक कार्यकर्त्यांना वाटत आहे. या प्रकाराबाबत वेळीच उपाययोजना केली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीतही यांचे दुष्परिणाम दिसू शकतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
या उलट महाविकास आघाडीमध्ये कार्यकर्त्यांना मोजकीच ‘रसद’ पुरवण्यात आली. परंतु तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत ही “रसद“ पोहचली होती त्यामुळे त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता तळमळीने काम करत असल्याचे दृश्य दिसत होते.