📰 MUMBAI MITRA FOLLOWUP
——-
* मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस हद्दीत 5 महिन्यात 117 चालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हचे गुन्हे दाखल
* बियर शॉपीच्या नावाखाली बेकायदेशिर ‘बियरचे गुत्ते’?
* एफएल बीआर 2 लायसन्सच्या नियमांचा भंग; दारुबंदी कायद्याची पायमल्ली!
——–
विशेष प्रतिनिधी, वसई
मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांशी संलग्न असलेल्या वाहतूक पोलीस विभागाच्या काशिमीरा युनिटने 1 जानेवारी ते 4 जून 2024 या पाच महिन्यांत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या 117 चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याला कायद्याची पायमल्ली करत सर्व नियम-अटी-शर्ती यांचा भंग करत दारू विकणाऱ्या बियर शॉपी जास्त प्रमाणात कारणीभूत आहेत. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याने मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकत्रीतपणे कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील जनतेकडून करण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर अधिक्षक सुधाकर कदम यांनी लायसन्स दुकानांवर गुन्हा दाखल करता येत नाही अशी प्रतिक्रीया ‘दै. मुंबई मित्र’शी बोलताना दिली होती, परंतू एफएल बीआर2 लायसन्सच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ‘बियरचे गुत्ते’ उभारुन बियर पिण्याची व सोबत खानपानाची सोय केली जात असल्याचे चित्र ‘दै. मुंबई मित्र’ ने उघडकीस आणले.
पुण्यातील बहुचर्चित ड्रंक अँड ड्राइव्ह घटनेनंतर राज्यभरात मद्य विक्री संदर्भातील कायद्यांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले. त्याप्रमाणेच मद्य प्राशन करून गाडी चालविणाऱ्या मद्य धुंद वाहन चालकांवर मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांशी संलग्न असलेल्या वाहतूक पोलीस विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांशी संलग्न असलेल्या वाहतूक पोलीस विभागाने (काशिमीरा युनिट) 1 जानेवारी ते 4 जून 2024 या पाच महिन्यांत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या 117 चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आपले काम जरी चोख बजावले असले तरी बेकायदेशीरपणे नियमबाह्य पद्धतीने बियर शॉपीच्या नावाखाली बेकायदेशिरपणे ‘बियरचे गुत्ते’ चालविणाऱ्यांचे परवाने रद्द कधी होणार? असा प्रश्न स्थानिक जनतेकडून विचारला जात आहे. याबाबत ‘दै. मुंबई मित्र’ ने पोलखोल करून अगदी छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध केले असूनही बियरच्या या गुत्त्यांवर नियमभंगाची थातुरमातुर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ‘दारुबंदी कायदा’ असतानाही राज्य उत्पादन शुल्कविभागाकडून या बियर शॉप वर अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. तरी या शॉप्सवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, जेणेकरून ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमध्ये बळी पडण्याच्या घटनांना आळा बसेल असे मत येथील जनतेकडून व्यक्त केले जात आहे.
‘विरारमध्ये- दारूबंदी कायदा कागदावर!’ अशा आशयाचे वृत्त ‘दै. मुंबई मित्र’ ने 28 मे 2024 रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ज्यामध्ये ‘दै. मुंबई मित्र’च्या प्रतिनिधीने स्वतः स्टिंग ऑपरेशन करत छायाचित्रांसह प्रसिद्ध केलेल्या या वृत्तामध्ये विरारमधील ग्लोबल सीटी परिसरातील लक्ष्मी बिअर शॉप, ए एम : पी एम द बियर शॉप, आई-बाबा बियर शॉप, आरुष बियर ॲन्ड वाईन्स या बिअर दुकानांबाहेर बेशिस्त मद्यपींना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रकार होत होता त्यामुळे ‘दारु बंदी कायदा महाराष्ट्रात आहे का? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. उल्लेख केलेल्या बियर शॉपीवर अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. याबरोबरच दिनांक 6 जून 2024 च्या ‘दै. मुंबई मित्र’च्या अंकात वसई ग्लोबल सिटी येथील ‘एमडी’ आणि विरारमधील ‘मास्टर्स’ या दोन बिअर शॉपीमध्येही अशाच प्रकारे कायद्याची पायमल्ली होत असून त्यांच्यावरही कठोर कारवाई करून “दारूबंदी कायद्यांतर्गत“ गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
