📰 MUMBAI MITRA ANALYSE
——-
◆ वनराई पोलिसांची कार्यकुशलता
◆ पुरावे नष्ट केले असतानाही आरोपीला हरियाणात जाऊन ठोकल्या बेड्या!
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
“कानून के हाथ लंबे होते है,” या फिल्मी डायलॉगचा प्रत्यय पुन्हा एकदा वनराई पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे चर्चेत आला आहे. वर्षभर लिव्ह अँड रिलेशनशीपमध्ये असलेल्या गोरेगाव मधील गोरेगाव मधील अशोक नगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका जोडप्यापैकी प्रियकराने प्रेयसीची हत्या करून तो फरारी झाला होता. फरारी होण्यापूर्वी प्रियकराने सर्व पुरावे नष्ट केले होते. मात्र तरीही वनराई पोलिसांनी चिकाटीने तपास करत अखेर आरोपीला आठवड्याभरात थेट हरियाणा या राज्यात जाऊन बेड्या ठोकल्या. आपल्या प्रियकराचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून प्रेयसी करत असलेल्या वादामुळे कंटाळून तिची हत्या केल्याची कबुली अटक आरोपीने दिली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांनुसार,आठवड्या भरापूर्वी गोरेगाव पूर्व येथील अशोक नगर परिसरात एका महिलेचे प्रेत असल्याची माहिती वनराई पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली महिलेचे प्रेत पोस्ट मार्टेमसाठी पाठवून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. आणि हळू हळू लिव्ह इन रिलेशन शिपमधून झालेल्या या खूनाला वाचा फुटू लागली.
मृत तरुणीचे नाव दिव्या टोपे तर तिच्यासोबत राहणाऱ्या पुरुषाचे नाव जयराम लकडा होते. दोघेही ओडिसा राज्यातील मूळ रहिवासी होते. ओडिसातील सुंदरगड जिल्ह्यामधील सुरूलता सुंजोर गावात राहणाऱ्या दिव्या आणि जयराम यांचे गावातच प्रेम जुळले होते. दोघांच्याही घरातून या प्रेम प्रकरणाला विरोध असल्याने त्यांनी एक वर्षांपूर्वीच गावातून पळ काढला आणि मुंबईला पोहोचले. एक वर्षापूर्वी मुंबई पोहोचलेले दिव्या आणि जयराम ही दोघेही गोरेगाव पूर्व भागातील नेस्को या परिसरात मजुरी करायचे. राहण्यासाठी जागा नसल्याने दोघेही फूटपाथ वर दिवस कंठत होते.
हळूहळू जयरामने वीस हजार रुपये जमा केले.ही रक्कम अनामत रक्कम देऊन ५ हजार रुपये प्रतिमाह भाडे असे भाडे तत्वावर गोरेगावमधील अशोक नगरमध्ये एक रूम भाड्याने घेतली. येथे दोघे नवरा बायको सारखे एकत्र राहू लागली .
नऊ दिवस नवलाईचे संपताच. त्या दोघांच्या संसारात कुरबुरी होऊ लागल्या. जयरामचे इतर महिलांचे अनैतिक संबंध असल्याचा दिव्याला संशय येऊ लागला. तसे पाहता दोघांनीही कायदेशीररित्या विवाह केलेला नव्हता.मात्र दिव्या त्याला मनापासून आपला पती मानायची. साधारणतः कोणतीही विवाहित स्त्री आपली सवत सहन करत नाही. दिव्या ही जयरामला आपला पतीच मानत असल्याने ती देखील सवती मत्सराने पेटू लागली होती. यावरून त्या दोघांमध्ये दररोज वाद होऊ लागले.
दररोजच्या या भांडणाला अखेर जयराम कंटाळला. त्याने या वादावर कायमचा पडदा टाकायचा ठरवला. त्याने एका रात्री गुपचूप धारदार हत्याराने दिव्याची हत्या केली. दिव्याची हत्या केल्यावर त्याने सर्व पुरावे नष्ट केले आणि तो फरारी झाला.
साधारणतः मुंबईत गुन्हा केल्यानंतर परप्रांतीय आरोपी आपल्या मुळ गावी पलायन करतात.परंतु आपण आपल्या गावी गेल्यास पकडले जाऊ याची पक्की खूणगाठ बांधलेल्या जयरामने थेट हरियाणामध्ये धाव घेतली होती.
वनराई पोलिसांनी त्याच्या मूळ गावी म्हणजे ओडिसापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जयराम काही सापडला नाही. तरीही पोलिसांनी आपले अथक परिश्रम सुरु ठेवले. सीसीटीव्ही फुटेज आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने जयरामचा ठाव ठिकाणा पोलिसांनी शोधून काढलाच…..!
जयरामवर हरियाणा या राज्यात झडप घालून वनराई पोलिसांनी त्याला जेरबंद केला. त्याला बोरीवली येथील न्यायालयासमोर उभा केला असता न्यायालयाने जयरामला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.