📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——
◆ पुण्यातील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ घटनेनंतर डिस्को पबवर कठोर निर्बंध
——
◆ गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर पब चालकांमध्ये खळबळ
——
विशेष प्रतिनिधी, मुंबई
पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात दोन आय.टी. इंजिनियरचा बळी गेल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पब-डिस्कोबाबत कठोर निर्बंध आणले असून,ज्या पबमध्ये हिंसाचार घडले आहेत, त्या सर्व पबना टाळे ठोकण्याचा आदेश दिले आहेत. यामुळे मुंबईतील सर्व पब चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आणि ‘ब्रम्हा कॉर्प’ चे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांतने भरधाव कार चालवत दोन आय.टी. इंजिनियर्सना आपल्या कारखाली चिरडले. या घटनेनंतर संतप्त जमावाने वेदांतला पकडून चोप दिला. अल्पवयीन वेदांतला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर जमाव अधिकच संतप्त होऊन निदर्शने करू लागला. वेदांत अग्रवालने घटना घडण्यापूर्वी मित्रांसोबत ‘हॉटेल कोझी“ या पबमध्ये पार्टी केली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पबबाबत काही कठोर पाऊले उचलली आहेत. पबमध्ये जाणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे ओळखपत्र तपासण्यात यावे. आणि याची सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. पबच्या रस्त्यावर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’साठी नाकाबंदी करण्यात यावी. पब चालवण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियम अटी शर्तीचे पालन होत आहे की नाही याची पालिका प्रशासनाने वेळोवेळी तपासणी करावी, असे निर्देश फडणवीस यांनी जाहीर केले आहेत.
त्याचप्रमाणे ज्या पबमध्ये यापूर्वी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत,त्या पबना टाळे ठोकण्यात यावे, असे सक्त आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या आदेशामुळे मुंबईतील पब चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कारण मुंबईतील अनेक पबमध्ये हिंसाचाराच्या घटना वरचेवर घडत असतात. यापूर्वीही अशा अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत.
