📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ महाराष्ट्रात विविध ठिकाणी 52 लाखांचा गुटखा जप्त!
◆ नवी मुंबई 4 लाख 81 हजार 504 रुपयांचा तर सोलापूरमध्ये 38 लाख व कराडमधून 10 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त
◆ नवी मुंबई आर्थिक गुन्हे प्रतिबंध शाखा, सोलापूर ग्रामीण पोलिस व कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रात विविध ठिकाणी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुटख्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक दिवसांपासून थंड पडलेल्या कारवाई संदर्भात ‘दै. मुंबई मित्र’ने नुकताच राज्य सरकार व पोलीस प्रशासनाशी पत्रव्यव्हार करून कारवाई करण्यासंदर्भात विनंती केली आहे. ‘दै. मुंबई मित्र’ मागील 7-8 महिन्यांपासून ‘ऑपरेशन गुटखा’ मोहिमे अंतर्गत गुटखा तस्करांची इत्यंभूत माहिती देण्याचा व पत्राच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला कळवण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात त्याच पार्श्वभुमीवर विविध ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. ज्यमध्ये नवी मुंबई 4 लाख 81 हजार 504 रुपयांचा तर सोलापूरमध्ये 38 लाख व कराडमधून 10 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नवी मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर ग्रामीण पोलिस व कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली आहे.
========
◆ कराड ः घोगाव गावच्या हद्दीत सुमारे 10 लाखांच्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतला. ही कारवाई शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यावेळी पोलिसांनी टेम्पोसह एकास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 9 लाख 64 हजार 900 रुपये किमतीची विमल पान मसाल्याची पोती व चार लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती असा एकूण 13 लाख 64 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गुटखा वाहतूक प्रकरणी समीर बाबासो मुलाणी ला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गाडीतील 9 लाख 64 हजार 960 रुपये किमतीची विमल पान मसाल्याची पोती व चार लाख रुपये किमतीचा अशोक लेलंड छोटा हत्ती असा एकूण 13 लाख 64 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिलारी करीत आहेत.
—–
◆ गोदामात गुटख्याची साठवणूक
नवी मुंबई: कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजाराच्या गोदामामध्ये यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी धाड टाकून लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता. दोन दिवसांपूर्वी लोखंड पोलाद बाजारातील गोदाम क्रमांक 449 मध्ये 4 लाख 81 हजार 504 रुपयांचा गुटख्याचा साठा पकडण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलीस दलाचे आर्थिक गुन्हे प्रतिबंध शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांना कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात अत्ताऊल्ला शेठ याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमलीपदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर, उत्तम लोखंडे, गणेश पवार, पोलीस नाईक संजय फुलकर यांच्या पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये अताऊल्ला याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तंबाखुचा साठा आढळला.
अताऊल्ला याला पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागातील काही कर्मचार्यांची साथ असल्याने वारंवार कारवाई होऊनही पनवेल, कळंबोली, कामोठे, तळोजा या परिसरात राजरोज पानटपर्यांवर गुटख्याची विक्री सुरु आहे.
—–
◆ सोलापूरमध्ये एकाला अटक
सोलापूरः हैद्राबाद महामार्गवर अवैध गुटखा वाहतूक करणारा आयषर ट्रक पोलिसांनी पकडला. अवैध गुटखा वाहतुकीबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर असलेल्या मुळेगाव तांडा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या ट्रकमधून तब्बल 38 लाख 45 हजार रुपयांच्या अवैध गुटख्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून, संजय राठोड असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.