📰 *MUMBAI MITRA वेध निवडणुकीचा!*
——-
◆ *विजयाचा चषक पियुष यांच्या हाती*
——–
*अभिजीत राणे*
समुह संपादक, दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र
यावेळची लोकसभा निवडणूक तशी धक्कातंत्राचाच एक भाग ठरते. एकतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यापेक्षा जास्त टप्प्यामध्ये मतदान होते आहे. मोदींच्या सर्वाधिक सभा यावेळेला महाराष्ट्रात होत आहेत. आणि अनेक अनपेक्षित उमेदवार देऊन याच धक्कातंत्राचा वापर केला गेलेला दिसतो. नियोजनपूर्वक आणि विजयी होण्याच्याच इच्छेने उमेदवारांची निवड केलीगेलेली दिसून येते. उत्तर मुंबई मतदार संघाचा विचार करताना काहीशा याच धक्कातंत्राचा अनुभव येतो. इथून पियुष गोयल यांना उमेदवारी मिळेल असे फारसे कोणाला वाटले नव्हते. परंतु इथेही धक्कातंत्राचाच वापर झाला. गोपाळ शेट्टी हे 2019मध्ये उर्मिला मातोंडकरांना विक्रमी मताधिक्याने पराभव करून निवडून आले. त्यांनी उत्तमरीतीने बांधणी केलेला हा मतदार संघ आणि तितक्याच निष्ठेने लोकांशी ठेवलेला संपर्क लक्षात घेतला तर त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे वाटले होते. परंतु पक्षाने पियुष गोयल यांची निवड केली. आणि त्यातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक वेगळा मेसेजही देऊ केला आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे भूषण पाटील हे निवडणूक लढवत आहेत. परंतु प्रामुख्याने या दोघांमधली लढत लक्षात घेतली तर खूप मोठा फरक तिथल्या तिथे जाणवतो. गोयल यांची राष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा , मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष होते. मुंबईतल्या सर्व स्तरातल्या लोकांशी संपर्क ठेवण्याची संधीही त्यांना मिळाली होती. गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यादेखील माटुंगा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. एक विशेष राजकीय पार्श्वभूमी असलेले आणि राजकारणाची नस माहीत असलेले पियुष गोयल यांची उमेदवारी एक सशक्त पर्याय म्हणूनच विचारात घ्यावी लागते. जणुकाही विजयाचा चषक गोयलांच्या हाती स्वतःहूनच विरोधकांनी देऊ केला आहे की काय असे वाटू लागते.
उत्तर मुंबई मतदार संघाचा विचार केला तर तो सर्वात मोठा मतदार संघ ठरतो. त्या मतदार संघाला मोठ्या दिग्गज नेत्यांचीही विजयाची पार्श्वभूमी आहे. या मतदार संघातून एकेकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कृष्ण मेनन, श्रीपाद डांगे यासारखे उमेदवारही उभे होते. मृणाल गोरे यांनीदेखील या मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. परंतु सर्वाधिक काळ ते प्रतिनिधीत्व करण्याचे श्रेय राम नाईक यांच्याकडे जाते. अर्थात त्यांनाही एकदा अभिनेता गोविंदा आणि संजय निरूपम यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तरीदेखील उत्तर मुंबई मतदार संघ हा आपल्या विविध लोकोपयोगी कामातून आपला बालेकिल्ला म्हणून सिद्ध केला. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणूकांमधून या मतदार संघाची चांगली मशागत झालेली आहे. भाजपाचे चार आमदारही या मतदार संघांमध्ये आहेत. त्या सगळ्या मशागत केलेल्या मतदार संघाचा फायदा पियुष गोयल यांना होणार आहे यात काही शंका नाही. सर्वात मोठा मतदार संघ आणि तितकाच मोठा मतदार संघ असल्याने आता पियुष गोयलांसारखी मोठी व्यक्ती निवडणूक लढणार असल्याने राम नाईकांनंतर या मतदार संघाला पुन्हा पियुष गोयलांच्या रूपाने तितकाच तरूण आणि अभ्यासू मंत्री उपलब्ध होऊ शकतो. त्यांचे मंत्रीमंडळातले स्थान 99 टक्के नक्की आहे असे समजायला हरकत नाही. आतापर्यंत ते राज्यसभेवरच निवडून गेले. लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. परंतु भाजपाचे माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री राहिलेल्या पियुष गोयलांना तिथून लोकसभेसाठी उतरवणे हेसुद्धा खूप अर्थपूर्ण ठरते.
त्यांच्या या निवडून येण्याचे श्रेय मतदारांना तर जाईलच परंतु या मतदार संघाच्या काही मूलभूत समस्या आहेत. त्याच्या निराकरणाकडेही त्यांना लक्ष द्यावे लागेल. अर्थात गेल्या काही वर्षाच्या त्यांच्या अनुभवाचा उत्तर मुंबईच्या मतदारांना निश्चितच लाभ होऊ शकेल. आज तरी विजयाचा चषक पियुष यांच्या हाती आहे असेच त्याचे वर्णन करावे लागते.