📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ अकोल्यामध्ये गुटखा किंग नदीम शाह रेहमान शाह गजाआड
◆ ७ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त
◆ दहीहंडा पोलिसांची धडक कारवाई
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
अकोला : मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्या चौहट्टा बाजार येथील ”गुटखा किंग” नदीम शाह रेहमान शाह याला गुटख्याची तस्करी करताना दहीहंडा पोलिसांनी अखेर गजाआड केले. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री डोंगरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी ही कारवाई केली.ही कारवाई म्हणजे “दै.मुंबई मित्र’ने ” सुरु केलेल्या गुटखा विरोधी मोहिमेचा इम्पेक्ट समजला जातो.
पोलीस सूत्रानुसार, दहीहंडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्रीच्या सुमारास गस्त घालताना मिळालेल्या माहितीवरून पोलीस कर्मचारी व पंचाचे मदतीने नाकाबंदी करून धाड टाकली असता नदीम शाह रेहमान शाह यांच्या कब्जातून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा/पान, मसाला अवैधरीत्या वाहतूक करताना सापडला. विशेष म्हणजे नदीम शाह रेहमान शाह हा मागील अनेक वर्षापासून चौहट्टा बाजार परिसरात गुटख्याची अवैध विक्री करत होता.
गेल्या तीन वर्षापासून दहीहंडा पोलिसांना चकवा देत पसार होत होता. मात्र आज पहाटे २.३० वाजताच्या सुमारास टाकळी रस्त्याने हा इसम आपल्या चारचाकी महिंद्रा एक्सयुव्ही पांढऱ्या रंगाची गाडी क्र एम एच ०२ सीपी ०६०० ने येत असल्याचे निदर्शनास आले. दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे आणि कर्मचारी आधीच सापळा लावून होते. सदर इसमाने गाडी त्याच्या घरासमोर थांबवताच पोलिसांनी त्याच्या गाडीची झडती घेतली एकूण ७,६४,४३१ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या विरोधात फिर्यादी म्हणून ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत नदीम शाह रेहमान शहा याला गजाआड केले.पोलीस अधिकारी विजयसिंह चव्हाण यांच्यासह याप्रकरणी पुढील तपास पुरुषोत्तम ठाकरे करीत आहेत. या संपूर्ण कारवाईत ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, प्रवीण पेटे, दिंडोकार, गोपाल अघडते, मनीष वाकोडे, रामेश्वर भगत, अनिल भांडे यांनी सहभाग घेतला होता.
