📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ गोरेगावच्या तीन डोंगरीतील रहिवासी दिवस ढकलताहेत घाणीच्या साम्राज्यात
◆ छोट्या गल्ल्या, रस्त्यावर नाल्याचे पाणी, कचर्याचे ढिगारे ही परिसराची ओळख
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
छोट्या गल्ल्या, रस्त्यावरून ओसंडून वाहणारे गटाराचे नाले आणि कचर्याचे साम्राज्य ही गोरेगाव पश्चिम येथील तीन डोंगरी परिसराची ओळख बनली आहे. सुमारे 30 हजारांची लोकसंख्या असलेल्या या भागात काही ठिकाणी शौचालयांबाबतही बोंब आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.56 मध्ये असलेल्या या परिसराकडे पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे ही नित्याची बाब ठरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम येथील तीन डोंगरी परिसरामध्ये हनुमान नगर, ए वन बेकरी, आदर्श नगर, जयहिंद सोसायटी, विनायक नगरचा समावेश आहे. येथील लोकसंख्या सुमारे 30 हजारांच्या आसपास आहे. या परिसरात शौचालयासारख्या मूलभूत गरजाबाबतही बोंब आहे. मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय लोक इथे गुण्या गोविंदाने व एकमेकात सरमिसळ होऊन राहतात.
मात्र या परिसरातील गल्ल्या खूपच अरुंद आहेत. रस्त्यालगतचे नाले ओसंडून वाहत असल्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे येथील नागरिकांना तोंडाला रुमाल लावून जावे लागते. पावसाळ्यात तर येथे रस्ते जलमय होऊन जातात. लोकांच्या घरात पाणी शिरते. कचर्याबाबत तर बोलूच नये अशी बिकट अवस्था आहे. येथे जागोजाग कचर्याचे ढिगारे आढळून येतात. नाल्याच्या कडेवरील या कचराच्या ढिगार्यातील कचरा हळूहळू नाल्यातही पडू लागतो. त्यामुळे नाले अधिकच चोकप होऊन जातात.
तीन डोंगरी परिसरात अनेक सोसायट्यांच्या नाल्यामध्ये समरूपता नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहायला वाव राहत नाही. काही ठिकाणी तर नाल्यावरच लोकांनी शिड्या बसवून घेतल्या आहेत. त्यामुळे पाणी वाहायला जागा उरत नाही. परिसरात रस्ते बनवण्याचे काम सुरू असल्यामुळे कचरा उचलण्यासाठी मोठ्या गाड्या येथे येऊ शकत नाही. त्याऐवजी छोट्या गाडयांनी कचरा उचलावा लागायचा, असे स्पष्टीकरण पालिकेतील सूत्र देत आहेत.
मात्र पालिकेचे हे स्पष्टीकरण पचनी पडत नाही. नाल्यांमध्ये समरूपता नाही. असे पालिकेने म्हणणे म्हणजे स्वतःच्याच अपयशाची कबुली देण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटत आहे. त्याचप्रमाणे डेंग्यू, मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण याच परिसरात आढळत असल्याची माहिती एका स्थानिकाने दिली.
जोपर्यंत येथील झोपड्यांचा पुनर्विकास होत नाही. तोपर्यंत येथील नागरिकांच्या समस्या संपणार नाहीत, असे वाटते.
या प्रकरणी गोरेगाव येथील मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हा संपर्क होऊ शकला नाही.
