📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ 16 लाखांच्या गुटख्यासह 31 लाखांचा मुद्देमाल जप्त
◆ धुळे आणि मिरजमध्ये पोलिसांची गुटख्यावर कारवाई
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘दै. मुंबई मित्र’च्या गुटखाविरोधी मोहिमेला दिवसेंदिवस धार चढत चालली असून राज्यातील सतर्क पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला जात आहे. मिरज-कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्ट जवळ मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत 11 लाखांच्या गुटख्यासह 16 लाख 50 हजारांचा गुटखा जप्त केला तर दुसर्या घटनेत धुळे गुन्हे शाखेने 5 लाखांच्या गुटख्यासह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केली. या दोन्ही प्रकरणांमध्ये वाहनचालकांना अटक करण्यात आली असून ही कारवाई म्हणजे ‘दै. मुंबई मित्र’चा ‘इम्पॅक्ट’ समजली जाते.
पोलीस सूत्रांनुसार, पहिल्या घटनेत मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्ट जवळ स्थिर सव्हक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत 16 लाख 50 हजार रुपयांचा गुटखा, गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख (वय 28) रा.सांगली याला मिरज ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था रहावी या हेतूने शासनाने सीमारेषेवर चेकपोस्ट उभा केले आहेत. आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक (चक 10 उठ 0641) गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती. यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती.
यावेळी पोलीस नाईक प्रविण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास 11 लाख 60 हजार रुपये किंमतीचा गुटखा सापडला. स्थिर सव्हक्षण पथकाचे पथकप्रमुख महेशकुमार लांडे, सुनील कोरे, राँकेश शिंदे, राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर …3/-
16 लाखांच्या गुटख्यासह 31 लाखांचा मुद्देमाल जप्त यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले, भारत पवार, यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.
दुसर्या घटनेत धुळे जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषन शाखेने सोनगीर येथे गुटख्याची वाहतूक करणार्या वाहनासह संशयिताला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे पाच लाखांचा गुटखा व दहा लाखांचे वाहन असा सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवारी (ता. 15) सायंकाळी सहाच्या सुमारास सोनगीर फाट्यावर ही कारवाई झाली.
दिल्लीहून महाराष्ट्रात गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांनी सोनगीर फाट्याजवळ सापळा लावला. सायंकाळी सोनगीरकडे येणारा ट्रक (एनएल 01, एडी 9938) थांबवून तपासणी केली असता त्यात दहा पोत्यांत सुमारे चार लाख 92 हजार 480 रुपये किमतीचा राज्यात प्रतिबंधित एसएचके गुटखाची पाकिटे आढळून आली.
गुटखा व दहा लाखांचे वाहन असा 14 लाख 92 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित वाहनचालक ब्रजेशकुमार श्रीअशोक यादव (वय 29, रा. दुर्गापूर, शेरवान, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) यास अटक करण्यात आली.
अन्नसुरक्षा प्रशासन अधिकारी किशोर बाविस्कर यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक सुकदेव धरम तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे.
उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक रवींद्र महाले, सुकदेव धरम, पोलिस अविनाश कराड, प्रदीप धिवरे यांनी केली
◆ यवतमाळमध्ये गुटखा विक्री जोरात
राज्यात इतर ठिकाणी गुटख्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई होत असली तरी यवतमाळमध्ये गुटखा विक्री जोमात सुरू असल्याचे आढळून येते. मोठ्या व छोट्या रस्त्यांवर पान टपर्यांवर तसेच दुचाकीवर गुटखा विक्रेते खुलेआम गुटख्याची विक्री करताना दिसत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाला हे दिसत नाही काय? पोलीस प्रशासन डोळेझाक का करत आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.