📰 MUMBAI MITRA वेध निवडणुकीचा!
——-
◆ मुंबईत महायुतीचा फॉर्म्युला ठरला : निम्म्या जागा लढणार
◆ 3 जागा भाजप तर 3 जागा शिंदे गटाला
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
अखेर बर्याच चिंतन-मंथनानंतर मुंबईतील 6 जागावाटपाबाबत महायुतीमध्ये सहमती झाली असून उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य या तीन जागा भाजप तर दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम या जागा शिवसेना (शिंदे गट) लढणार आहे. यापैकी उत्तर मुंबई, उत्तर पूर्व, दक्षिण मध्य या ठिकाणी उमेदवार प्रचाराला लागले आहेत. याबरोबरच नाशिक, ठाणे, कल्याण, सिंधुदुर्ग या जागांवरही महायुतीमध्ये सहमती बनल्याचे सूत्रांकडून समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित झाल्याचे कळते. मुंबईतील एकूण सहा जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला तर तीन जागा शिंदे गटाला मिळाल्या आहेत. भाजप उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य या जागा लढवणार आहे. भाजपने या तीनपैकी उत्तर मुंबईतून पियुष गोयल आणि उत्तर पूर्व मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांच्या नावाची यापूर्वीच घोषणा केली असून ते प्रचारालाही लागले आहेत.उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही.
उत्तर मध्य मुंबईतून मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते. परंतु शेलार यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यावर भाजपने अनेक फिल्मी सितार्यांना निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याप्रमाणे आमदार पराग अळवणी आणि अमित साटम यांच्याही नावाची चर्चा झाली. मात्र ही नावेही मागे पडली. भाजपने उत्तर मुंबईतून राजस्थानी आणि उत्तर पूर्व मधून गुजराती उमेदवार दिल्यामुळे या जागेवर मराठी चार देणे, ही भाजपसाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. त्यामुळे या जागेवर पूनम महाजन हा मराठमोळा चेहरा देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. विरोधक उद्धव ठाकरे हे मुंबईच्या उमेदवारांबाबत प्रांतीय मुद्दा उपस्थित करण्याची रणनीती आखत आहेत. त्यामुळे येथून पूनम महाजन यांच्या नावावर पुन्हा शिक्का मोर्तब होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या मुंबईतील तीन जागांपैकी दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघातून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली असून त्यांनी प्रचाराचा धडाकाही सुरू केला आहे. उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईसाठी शिंदे गट उमेदवाराची चाचपणी करत आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एका नामांकित कायदे पंडितांच्या नावाचा विचार केला जात असून दक्षिण मुंबईत आश्चर्यचकित करणारे नाव शिंदे गट देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, ठाणे, कल्याण आणि सिंधुदुर्ग या जागांबाबत महायुतीमध्ये सहमती झाल्याचे कळते. मात्र या जागांवरील असंतुष्टांच्या बंडखोरीला वाव मिळू नये म्हणून समजूतपूर्ण माहोल बनवून मगच महायुती या जागांवर उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे.
खरे तर मुंबईतील सहापैकी पाच जागा भाजपला लढवायच्या होत्या. परंतु यापूर्वी अखंड शिवसेनेतून दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईतून लढायची, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळीही असली शिवसेना आणि नकली शिवसेना या लढाईत शिंदे गटाला बाळ देण्यासाठी उदारपणे तीन जागा दिल्या आहेत. शिवाय शिवसेनेच्या (उबाठा) मत विभागणीचाही उद्देश आहे.