📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ धुळे जिल्ह्यात साडे दहा लाखांचा गुटखा जप्त
◆ साड्यांच्या बंडलातून गुटख्याची तस्करी
◆ कारागृहाच्या भितींवरून गुटख्याचा पुरवठा!
◆ नाशिकच्या बंगल्यातून 6 लाखाचा गुटखा जप्त
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या नाकाबंदी पथकाने कुसुंबा-मालेगाव रोडवर साड्या व इतर कपड्यांखाली गुटख्याच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी चालक व सहचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 लाख 62 हजार 874 रुपयांचा माल तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शन व सूचनेवरून पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. ‘दै. मुंबई मित्र’ने सुरू केलेल्या गुटखाविरोधी ‘ऑपरेशन गुटखा’ या मोहिमेचा हा ‘इम्पॅक्ट’ समजला जातो.
लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे जिल्ह्यातील सीमावर्ती भागात ठिकठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. या चौक्यांवर एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाणार्या वाहनांची सखोल तपासणी केली जात आहे.
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांना रविवारी मिळालेल्या माहितीनुसार, सुरतहून निघालेला व कुसुंबामार्गे मालेगावकडे जाणारा माल ट्रक अजनाळेच्या हद्दीतील कुसुंबा-मालेगाव रस्त्यावरील सीमा चेकपोस्टवर थांबला होता. धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाव. पोलिसांनी चालक वाहिद पिंजारी, सहचालक शोएब खान (दोघेही मालेगाव, जि. नाशिक) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांना त्यांचा खाक्या दाखवताच या दोघांनी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या मालवाहू वाहनात गुटखा असल्याचे सांगितले. निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक महादेव गुट्टे, कॉन्स्टेबल कुणाल पानपाटील, विशाल पाटील, कुणाल शिंगणे, धीरज सांगले, रवींद्र राजपूत यांनी ही कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या वस्तू साड्या व इतर वस्तूंची तस्करी करणार्यांकडे आढळून आली. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
◆ कारागृहाच्या भितींवरून गुटख्याचा पुरवठा!
प विशेष प्रतिनिधी, राजस्थान
जिल्हा कारागृह परिसरात बंदी असलेले साहित्य भिंतीवर फेकल्याची घटना समोर आली आहे. हे प्रतिबंधित साहित्य कैद्यांच्या आदल्या रात्री गस्त घालणार्या रक्षकांच्या हाती लागले. याप्रकरणी जंक्शन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृहातील सेन्टीनल साक्षी (26, रा. चिमणलाल, रा. दुबलीकलन ता. तलवाडा झील) यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक योगेशकुमार तेजी यांना पत्र सादर करताना सांगितले की, शनिवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कारागृहात रक्षक गस्त घालत होते. रविवारची रात्र होती.
गस्तीदरम्यान कारागृहातील वॉर्ड एकच्या बॅरेक क्रमांक दोनच्या मागे असलेल्या गॅलरीत एक काळे पॅकेट आढळून आले. या पाकिटात तंबाखूचे (10 पाऊच), गणेश छाप जर्दा (पंधरा पाऊच) तानसेन गुटख्या आणि चार पाकिटे सिगारेट व एक लायटर होते. हे प्रतिबंधित साहित्य कैद्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने बाहेरील रस्त्यावरून कारागृहाच्या आत फेकले होते.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 42 प्रिझन (राजस्थान सुधारणा) कायदा 2015 नुसार गुन्हा दाखल केला असून तपास एएसआय कृष्णलाल सौनी यांच्याकडे सोपवला आहे.
*****
◆ नाशिकच्या बंगल्यातून 6 लाखाचा गुटखा जप्त
प विशेष प्रतिनिधी, नाशिक
दिंडोरी रोडवरील कलानगर परिसरातील लेन 1 मधील गुरूमाऊली बंगला क्रमांक 69 मध्ये सुमारे 6 लाख 60 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित भास्कर गरड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आल्याचे कळताच गरड याने बंगल्यातून धूम ठोकली. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अंमलदार पंकज चव्हाण यांना दिंडोरी रोड, कलानगर लेन 1, गुरुमाऊली बंगला क्रमांक 69 येथे प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांना दिली. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, उपनिरीक्षक यु .एम.हाके, हवालदार देवराम चव्हाण, अंमलदार पंकज चव्हाण, पंकज महाले, गिरिधर भुसारे, बाळासाहेब मुर्तडक, जितू शिंदे यांनी या बंगल्यावर छापा टाकला.
पोलीस आल्याचे कळताच बंगल्यात असलेल्या संशयित भास्कर गरड याने पळ काढला. बंगल्याची पथकाने तपासणी केली असता त्यांना वेगवेगळया रंगाचे प्लॅस्टिक गोण्या व खाकी रंगाचे बॉक्स मिळून आले. या बॉक्समध्ये विविध कंपन्यांचा पान मसाला, तंबाखू असा एकूण 6 लाख 60 हजार 60 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दिंडोरी रोडवरील गुरुमाऊली बंगलामधून सुमारे 6 लाखाचा प्रतिबंधित पानमसाला गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित भास्कर लक्ष्मण गरड यास लवकरच अटक केली जाईल. त्याने गुटखा कुठून आणला तसेच कुठे विक्री करणार होता याबाबत तपास केला जाईल. अशी माहिती म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली.