📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ सांगली-पुण्यात गुटख्यावर कारवाई
◆ 18 लाख 63 हजारांचा गुटखा जप्त
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘दै. मुंबई मित्र’च्या गुटखा विरोधी मोहिमेला आतापर्यंत चांगलेच यश मिळत असून या मोहिमेचा इम्पॅक्ट राज्यभरात जाणवत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या गुटखा कारवायांमध्ये पोलिसांनी सांगलीमध्ये 17 लाख 30 हजारांच्या गुटख्यासह एकूण 25 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर पुणे पोलिसांनी सुमारे 1 लाख 33 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाया म्हणजे ‘दै. मुंबई मित्र’चा इम्पॅक्ट आहे.
======
सांगली : म्हैसाळ ते मिरज रस्त्यावर सुगंधी तंबाखू, गुटखा तस्करी करणाऱी पिकअप स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडून 17 लाख 30 हजाराचा माल जप्त केला. पिकअपसह 25 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करून मधुसुदन महेश मगदूम याला अटक केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस पथकाला म्हैसाळ ते मिरज रस्त्यावरुन एका पिकअपमधून शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांनी चोरुन विक्री करण्यासाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी परिसरात सापळा लावला होता. सायंकाळी 5 च्या सुमारास पिकअप (एमएच 08 एपी 5047) भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यावर चालकाने रस्त्याकडेला वाहन थांबविले.
पोलिस चौकशीत चालक मगदूम याने कर्नाटकातील कुडची येथील प्रोपायटर पाटील याच्या गोदामामधून भरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच स्वप्नील प्रभाकर लुगडे याच्या सांगण्यावरुन हा माल तेथे भरुन समतानगर येथे पोहचविण्यात येणार असल्याची कबुली दिली. संशयित मगदूम याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===========
पुणे ः दिघी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली. 1 लाख 33 हजार 201 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल शहाजी जगताप याच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप यांनी गंगानगर येथील पांढरकर उद्यानाबाहेरील एका स्टॉलमध्ये गुटखा विक्रीसाठी ठेवला होता.
निगडी पोलिसांनी सोमवारी कारवाई करून 65 हजार 326 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी सत्यमसिंग कमलेशसिंग परिहार (वय 24, रा. चऱ्होली बुद्रुक) आणि आशिष अशोक जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
