📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ मुंबई व वसई-विरार परिसरात ‘वरानसी आशिक सुगंधी सुपारी’ची दिवसाढवळ्या विक्री
◆ आशिक सुपारी दिल्लीत तयार केली जात असून दररोज ट्रक च्या माध्यामातून येते भिवंडीत?
◆ ‘वरानसी आशिक सुगंधी सुपारी’ चा ठाण्याचा प्रमुख (सीएनएफ) ‘कुमार’तर, ‘दहिसर’ची जबाबदारी ‘संजय’ कडे?
◆ मुंबईतील कांदीवली, बोरीवली, जोगेश्वरी परिसरांमध्ये तर वसई, नालासोपारा व विरार येथे जोमात विक्री
◆ दररोज तब्बल 20 लाखांची उलाढाल
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई उपनगरांत व वसई-विरार परिसरात सध्या गुटख्याच्या बाजारात ‘वरानसी आशिक सुगंधी सुपारी’ मोठ्याप्रमाणात बेकायदेशीरपणे विकली जात आहे. मुंबईतील कांदीवली, बोरीवली, जोगेश्वरी परिसरांमध्ये तर वसई, नालासोपारा व विरार येथे या सुगंधी सुपारी व सोबत तंबाखू असा मावा बनवून जोरदार विक्री होत आहे. दररोज तब्बल 20 लाखांची उलाढाल या गुटख्याच्या माध्यमातून रोज होत असल्याचे समजते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘वरानसी आशिक सुगंधी सुपारी’ आणि त्याचा सोबत येणारा तंबाखू हा सध्या दररोज मुंबई व वसई-नालासोपाऱ्यात येत असून हे दिल्लीत तयार केले जात असून दररोज ट्रक च्या माध्यामातून भिवंडीत येतात. ‘वरानसी आशिक सुगंधी सुपारी’ चा ठाण्याचा प्रमुख (सीएनएफ) ‘कुमार’ आहे तर, ‘दहिसर’ची जबाबदारी संजय याच्याकडे आहे.‘वरानसी आशिक सुगंधी सुपारी’ दिवसाढवळ्या मुंबई व उपनगरांत विकली जात आहे.
‘दै.मुंबई मित्र’ ने ‘ऑपरेशन गुटखा’ या मोहिमेअंतर्गत अनेक गुटखा तस्करांची पोलखोल केली असून ‘दै.मुंबई मित्र’च्या पाठपुराव्यामुळेच शौकत अली, फैसल नागोरी अशा बड्या गुटखा तस्करांना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. कालपर्वाच महाराष्ट्र राज्यातील गुटखाबंदी विरोधात याचिका दाखल करणाऱ्या ‘रजनीगंधा’ गुटखा उत्पादकाला सणसणीत चपराक लावत मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत राज्यातील गुटखा व पान मसाल्यावरील तसेच इतर तंबाखूजन्य वस्तूंवरील बंदी कायम ठेवली आहे. यामुळे ‘दै. मुंबई मित्र’च्या गुटखाविरोधी मोहिमेला चांगलीच बळकटी मिळाली आहे. गेल्या 8 महिन्यांमध्ये ‘दै. मुंबई मित्र’ने गुटख्याविरोधातील ‘ऑपरेशन गुटखा’ मोहिमेअंतर्गत गुटखा विरोधी वृत्तांताबरोबरच सातत्याने लेखी तक्रारींचा सपाटाच लावला होता आणि त्याची प्रशासनाने चांगलीच दखल घेतली होती.
उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात पानमसाला व गुटखा बंदी संदर्भात कठोर शब्दात आदेश दिले असले तरी गुटखा तस्कर मात्र महाराष्ट्रात गुटखा विक्रीसाठी नवनव्या क्लुप्त्या तयार करीत असून यावर मुंबई पोलीस व वसई-विरार मिरा भाईंदर पोलीस काय कारवाई करतात व मुंबई आणि उपनगरांत दिवसाढवळ्या बेकायदेशीरपणे विकल्या जाणाऱ्या ‘वरानसी आशिक सुगंधी सुपारी’ कशा प्रकारे निर्बंध घालतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
