📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ मुलुंडच्या म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांची सुरक्षा धोक्यात
◆ वीज मंडळ आणि पालिकेच्या भांडणात मुलुंड म्हाडा वसाहतीमधील 47 पथदिवे बंद
◆ 16 लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी
◆ सुमारे 10 हजार नागरिकांची वसाहत
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
16 लाख रुपयांच्या वीज बिलाच्या थकबाकीवरून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी) आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यात चांगलीच जुपली आहे. मात्र दोघांच्या या भांडणात मुलुंडमधील म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांना रस्त्यावरील अंधारातून वाटचाल करावी लागत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुलुंडमधील म्हाडा वसाहतीमध्ये सुमारे 10 हजार नागरिक राहतात. ही वसाहत खाडीजवळ असल्याने साप व इतर प्राणी या परिसरातील रस्त्यावर आढळतात. त्यातच भरीस भर म्हणून गेल्या आठवडाभरापासून येथील रस्त्यावरील 47 पथदिवे बंद आहेत.याबाबत राहिवाशांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडे (एमएसईबी) विचारणा केली असता एमएसईबी अधिकाऱ्यांनी पालिकेद्वारे 16 लाख रूपयांची बिले थकीत असल्याने रस्त्यावरील विजपुरवठा खंडीत केल्याचे रहिवाशांना सांगितले.वीज तोडण्यापूर्वी म्हाडाला नोटीस दिल्याचेही एमएसबीई तर्फे स्पष्ट करण्यात आले.
ऑगस्ट 2023 पासून पालिकेने एमएसईबीला थकित बिलांचे पेमेंट केले नाही. एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेतल्या असून संबंधित विभागाला पत्रे लिहिल्याचे म्हंटले आहे. पालिकेने आपल्या एकही पत्राचे उत्तर गेल्या सहा महिन्यात दिले नाही. असेही एमएसईबी चे म्हणणे आहे.
याबाबत राहिवाशांनी पालिकेच्या ‘टी’ वार्डच्या अधिकाऱ्याशी सपंर्क साधला असता पालिकेने सर्व बिले रितसर भरल्याचा दावा करत एमएसईबीचा आरोप फेटाळून लावला आहे. एमएसईबीचे कोणतेही बिल प्रलंबित नाही. एमएसईबीनी सांगत असलेले 16 लाखाचे बिल हे 4-5 वर्षांपूर्वीचे असून जुनी बिले भरण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात आणि त्यानां थोडा वेळ लागतो. असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र पालिका आणि एमएसईबीच्या या भांडणात म्हाडा वसाहतीमधील रहिवासी चांगलेच कात्रीत सापडले आहेत. रात्रीच्या वेळी त्यानां मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. ही वसाहत खाडीजवळ असल्याने वरचेवर या रस्त्यावर साप इतर प्राणी आढळतात.अंधारात असा एखादा वन्य जीव पायाखाली आल्यास काय करावे, या चिंतेने येथील रहिवासी धस्तावले आहेत.अंधाराचा गैरफायदा घेऊन चोर लुबाडण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. या अंधारामुळे येथील महिला आणि मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.त्यामुळे येथील राहिवासी जीव मुठीत धरून रस्त्यावरून जात आहेत.