📰 MUMBAI MITRA वेध निवडणुकीचा!
——-
◆ पालघर मतदारसंघात सर्वाधिक संभ्रम!
◆ राजेंद्र गावित विरुद्ध बविआ लढत होण्याची दाट शक्यता?
◆ पूर्वोतिहासानुसार महायुतीत पालघर मतदारसंघ भाजपाकडे?
——–
विशेष प्रतिनिधी, वसई
पालघर मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. पालघरमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन विकास आघाडी (बविआ) अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता दिसत आहे. या तीनही आघाड्यांकडून अद्याप आपला उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आपला प्रचारही सुरू केला असून त्यांना ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तांत्रिकदृष्ट्या गावित हे शिवसेनेत (शिंदे गट) असले तरी ऐनवेळी ते सेनेच्या की भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम कायम आहे. निवडणुकीत तिरंगी लढतीची अटकळ बांधली जात असली तरी पूर्वोतिहास पाहता यावेळीही या मतदारसंघामध्ये राजेंद्र गावित विरुद्ध बविआचा उमेदवार या दोघांमध्येच खरी लढत होण्याची दाट शक्यता आहे.
बाविआ हा पक्ष महायुतीत असल्याचे मानले जाते. 7 महिन्यांपूर्वी ‘मिशन-48′ अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीला हितेंद्र ठाकूर हे उपस्थित होते. मात्र दोन महिन्यांपूर्वी महायुतीचा मेळावा होता. या मेळाव्याला महायुतीतील 15 घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले होते. मात्र या पत्रकार परिषदेत व नंतर झालेल्या महायुतीच्या मेळाव्यालाही बविआच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली. त्यामुळे बविआ आपला स्वतंत्र उमेदवार जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
पालघर मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचा बराच बोलबाला आहे. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बविआचे बळीराम जाधव हे निवडून आले होते. मात्र, जाधव यांच्या अगोदर आणि नंतरही चिंतामण वणगा हे भाजपच्या तिकिटावर दोनदा निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत अखंड शिवसेना आणि भाजपची युती होती. राज्यात पुन्हा सत्ता स्थापनेच्यावेळी अडीच वर्षे शिवसेनेचा तर अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री या अटींमुळे 25 वर्षांची युती तोडल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावेळी अमित शाह यांच्याशी ‘बंद दाराआड’च्या चर्चेचा खुलासा करत फडणवीस यांनी अशी कोणतीही अट नसल्याचे स्पष्ट करत केवळ पालघरची जागा शिवसेनेने मागितली म्हणून सोडल्याचा दावा केला होता.
वास्तविक पाहता पालघरची लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच होता. चिंतामण वाणगा यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा शिवसेनेने हट्टाने आपल्या पदरात पाडून घेतली. परंतू, त्यावेळी शिवसेनेकडे बविआला टक्कर देण्यासाठी सशक्त उमेदवारच नव्हता. त्यामुळे मूळ अखंड शिवसेनेचे असलेले व भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र गावित यांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली होती. सध्या राजेंद्र गावित हे शिवसेनेत (शिंदे गट) आहेत. राजेंद्र गावित यांचा मूळ अखंड शिवसेनेतून भाजपमध्ये व पुन्हा शिवसेनेत (शिंदे गट) हा प्रवास एव्हढ्या वेगाने झाला आहे की, त्यामुळे मतदारांना सोडाच कार्यकर्त्यानांही ते आता कोणाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, याची शाश्वती नाही.
दुसरीकडे बविआची भूमिकाही या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात 12 लाख 32 हजार 74 मतदार आहेत. तर उर्वरित तीन विधानसभा मतदार संघात 8 लाख 57 हजार 636 मतदार आहेत. त्यामुळे सुमारे 21 लाखांच्या घरात पोहोचणाऱ्या या मतदारसंघावर बविआचे बरेच वर्चस्व आहे. कारण वसई, नालासोपारा, आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात बविआचे आमदार आहेत. तसेच निर्णायक ठरणाऱ्या वसई-विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. उर्वरित मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) एक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा एक आणि शिंदे गटाचा एकमेव आमदार आहे. या मतदार संघातील हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचा हा वरचष्मा पाहता त्यांची भूमिका निर्णायक ठरते ती यामुळेच!
===
‘कमळ’ पुन्हा फुलावे ः उत्तम कुमार
‘हा मतदारसंघ भाजपचा असल्याने येथे ‘कमळ’ पुन्हा फुलावे, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. मात्र आम्हाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश शिरसांवद्य असल्याने त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करू असे संयोजक, महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ, भाजपचे उत्तम कुमार यांनी स्पष्ट केले.
===
आम्ही महायुतीचा धर्म पाळतो ः निलेश तेंडोलकर
आम्ही महायुतीचा धर्म पाळतो. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही काम करतो. त्यामुळे कमळ की धनुष्यबाण याबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील तीच आमची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी दिली.
===
बविआची पाच उमेदवारांची चाचपणी: अजीव पाटील
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबद्दल निर्णय बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर हेच घेणार आहेत. सध्या याबाबत चाचपणी सुरू असल्याचे बविआचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या बैठकीला उपस्थित परंतू मेळाव्याला अनुपस्थितीत राहिल्याबद्दल विचारले असता लोकसभा, विधानसभा, पालिका, पंचायत निवडणुका वेगवेगळ्या असतात, त्यामुळे प्रत्येक वेळी पक्षाचे निर्णय वेगवेगळे असू शकतात असे अजीव पाटील म्हणाले. बोईसरचे बविआचे आमदार राजेश पाटील यांच्या उमेदवारीबाबत बोलताना आमची पाच उमेदवारांची तयारी असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बविआचा उमेदवार ठरत असतो, असे सूचक विधान अजीव पाटील यांनी केले आहे. उमेदवार द्यावा महायुतीतून द्यावा सर्वस्वी निर्णय हितेंद्र ठाकूरच घेणार आहेत. असे यावेळी ते म्हणाले.