📰 MUMBAI MITRA वेध निवडणुकीचा!
——-
◆ विधानसभा अध्यक्षांचे दालन झाले आमदार कार्यालय?
◆ स्वतःचा मतदार संघ बनविण्यासाठी धडपड?
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
घरातून व नात्यातूनही समृद्ध राजकीय वारसा लाभलेल्या आणि स्वतः विधानसभेच्या अध्यक्षपदासारखे उच्च प्रतिष्ठा लाभलेले पद असतानाही रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांसारखी अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबर वादावादी करणे, त्यांना दमदाटी करणे हे राहुल नार्वेकरांचे वर्तन दक्षिण मुंबईतील नागरिकांना मान्य नसल्याचे समजते. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षपद भूषवत असताना एखाद्या आमदारासारखे कार्यालयातून कामकाज चालवत स्वतःचा मतदार संघ बनविण्यासाठी धडपड करणाऱ्या राहुल नार्वेकरांविरुद्ध स्थानिक जनतेमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष अशा प्रतिष्ठित पदांवर बसून राजकारण करता येत नाही आणि जर राजकारण करायचे असेल तर सरळ आमदारकी किंवा खासदारकी लढवावी, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
कुलाब्यात बालपण घालवलेल्या राहुल नार्वेकर यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर थेट कायद्याची पदवी घेत वकील बनले. राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर हे कुलाब्यात नगरसेवक होते. त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे प्रभाग 227 मध्ये दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांची वहिनी हर्षिता ही देखील भाजपची नगरसेविका आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत.
शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडानंतर 2022 साली राज्यात नाट्यमयरित्या सत्तांतर झाले. त्यावेळी 3 जुलै 2023 रोजी राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष (सभापती) बनले. त्याचवेळी त्यांचे सासरे रामराजे निंबाळकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते. राज्याच्या दोन्ही सभागृहात सासरा जावई एकाच वेळी विराजमान झाले. हा राज्यातील दुर्मिळ योगायोग त्याचप्रमाणे आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये विधानसभा अध्यक्ष बनलेले राहुल नार्वेकर हे देशातील दुसरे तरुण अध्यक्ष होते.
राहुल नार्वेकर यांचा राजकीय वारसा एवढा समृद्ध असतानाही बऱ्याचदा त्यांचे वर्तन बुचकळ्यात टाकणारे असते. त्यांचे बोलणे, वागणे असे असते की, ते विधानसभा अध्यक्ष वाटत नसून सर्वसाधारण आमदार वाटतात, अशी अप्रत्यक्ष टीका स्थानिक जनतेकडून केली जात आहे. त्यांच्या कार्यालयातही ते आमदारासारखेच वागतात. त्यामुळे नार्वेकर हे अप्रत्यक्षरित्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा कमी करत आपल्याला आरोपही जाणकारांकडून केला जात आहे.
जाणकारांनी या बाबतीत ऑक्टोबर 2023 चे वरळीतील उदाहरण दिले. दक्षिण मुंबईतून लोकसभा उमेदवारीचे संकेत मिळताच राहुल नार्वेकर हे. मतदार संघ पिंजून काढू लागले. गेल्या सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये राहुल नार्वेकर हे वरळीमध्ये गेले असता, त्यांनी विकासकामांवरून भर रस्त्यातच अधिकारी कर्मचाऱ्यांना झापले, त्यांना दम ही भरला.
आणि याच्या बातम्याही चॅनल्सवर झळकल्या. आपण वरळी मतदारसंघाच्या दौऱ्यावर विधानसभा अध्यक्ष या नात्याने आलो होतो, असे नार्वेकरांचे स्पष्टीकरण जनतेला पचनी पडलेले नाही. खरेतर विधानसभा अध्यक्ष या पदावर विराजमान असताना आणि संपूर्ण राज्यातील कामे एका फोनवर करून घेण्याची ताकद असताना रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशक्ष हुज्जत घालण्यात काय अर्थ होता? असा प्रश्न जाणकार विचारत आहेत.
कदाचित नार्वेकरांचे हे वर्तन पाहूनच शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून नार्वेकरांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला असावा. अशी शक्यता वर्तविली जात आहे.
======
◆ 2014
मध्ये लोकसभा निवडणुकीत अखंड शिवसैनिक युवा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेल्या राहुल नार्वेकरांनी शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला.
◆ 2014
मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.पण त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले.
◆ 2019
मध्ये विधानसभा निवडणुकीत नार्वेकर हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. भाजपने त्यांना मीडिया इंचार्ज पदाचीही जबाबदारी दिली होती.