📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ पालघर जिल्ह्यात गुटखा विक्री व सेवनाविरुध्द कारवाईसाठी तलासरीत तालुकास्तरीय समिती स्थापन
——–
विशेष प्रतिनिधी, पालघर
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून पालघरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्या सूचनेनुसार तलासरीत तालुकास्तरीय समिती स्थापन करून गुटखा विक्री व सेवनाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासह तंबाखूमुक्ती केली जाणार आहे. अशी समिती प्रत्येक तालुका स्तरावर स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. कासा येथे झालेल्या बैठकीत तहसीलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी वैभव सापळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत कोळी, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भोये, जिल्हा सल्लगार मयूर बोंगे, समुपदेशक राजपूत जयपाल सिंग उपस्थित होते. ही समिती म्हणजे ‘दै. मुंबई मित्र’च्या गुटखा विरोधी मोहिमेचे यशच म्हणावे लागेल.
पालघर जिल्ह्यात गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा चोरट्या मार्गाने आणून त्यांची विविध तालुक्यांमध्ये विक्री केली जाते. या मोहिमेत तालुका तंबाखूमुक्त करण्यासाठी दुष्परिणामांबाबत जनजागृती, 100 मीटरपर्यंतच्या पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई, तंबाखूजन्य पदार्थ 2003 कायदा कलम 4 अंतर्गत या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे. तंबाखू, गुटखा विक्री व वापर बंद व्हावा, त्यांचे दुष्परिणाम याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत ही मोहीम राबवणार आहोत.
====
◆ गुटखासाठ्या प्रकरणी मीरा-भाईंदरमधील 10 विक्रेत्यांना अटक
◆ भाईंदर, नवघर व मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
अन्न व औषध प्रशासनाने शासनाने बंदी घातलेला गुटखा व तंबाखू विकणाऱ्या पान टपरी चालकांवर मंगळवारी कारवाई करत 10 पान टपरी चालकांना गुटखा साठ्यासह अटक केली आहे. याप्रकरणी भाईंदर, नवघर व मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘दै. मुंबई मित्र’ने 29 फेब्रुवारी 2024 च्या अंकात ‘मुंबई उपनगरात गुटखाबंदी नावालाच’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करून गल्ली बोळातील पान टपऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव,प्रशांत पवार व भरत वसावे यांनी मंगळवार 19 मार्च रोजी मीरा भाईंदरमध्ये गुटखा विकणाऱ्या पान टपरी चालकांवर धाडी टाकल्या. या प्रकरणी मीरारोड, भाईंदर व नवघर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रतिबंधित गुटखा – पानमसाला व सुगंधी तंबाखू आदींचा साठा जप्त करण्यात आला आहे. भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत भरत वसावे यांच्या फिर्यादी वरून गुटखा विक्रेते आरोपी सदाशिव देवी प्रसाद विश्वकर्मा, अजय महादेव बहादुर व गजराज रामलखन चौरसिया या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मीरारोड पोलीस ठाण्यात माणिक जाधव यांच्या फिर्यादी वरून गुटखा विक्रेते सुनीलकुमार श्यामलाल चौरसिया, मोनू जोखू चौरसिया व मोहम्मद समीम अली हुसेन अन्सारी अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर नवघर पोलीस ठाण्यात प्रशांत पवार यांनी दाखल गुन्ह्यानुसार जैन बंगल्याजवळील नंदिनी पान शॉप चालक सुरज रामस्वरत चौरसिया, हर हर महादेव पानशॉप चालक कृपाशंकर राजाराम चौरसिया, सोनू पानशॉप चालक अनुराग जिमीपाल सिंग येथील महालक्ष्मी पानशॉप चालक राजेंद्र रामबच्चन चौरसिया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.