📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
चाळीसगावात नऊ लाखांचा विमल गुटखा जप्त
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
——–
विशेष प्रतिनिधी,चाळीसगाव
चाळीसगाव येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री पूर्णपणे बंद असतानाही गुटख्याची विक्री करणाऱ्या एकावर पोलिसांनी बुधवारी (ता. 13) रात्री कारवाई करून त्याच्याकडील विमल गुटख्याच्या 18 गोण्यांसह इको वाहन असा मिळून सुमारे 9 लाख 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्तमाहितीनुसार शहरातील तिरंगा पुलावरून इको वाहनातून प्रतिबंधित विमल गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.
त्यानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी उपनिरीक्षक योगेश माळी, पंढरीनाथ पवार, भूषण पाटील, भटू पाटील, मनोज चव्हाण यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, वरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुलावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली.
रात्री सव्वा दहाच्या सुमारास इको वाहन (क्रमांक- एम.एच. 19 ईओ 3958) येताना दिसली. तिची तपासणी केली असता, त्यात लहानमोठ्या अशा 18 गोण्या
आढळून आल्या. सुरूवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांचा संशय बळावल्याने, त्यांनी गोण्यांची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला, मानवी आरोग्यास घातक व अपायकारक असलेला विमल (गुटखा) पान मसाला व सुगंधित तंबाखू मिळून आली.
याप्रकरणी अक्षय गुलाब कोतकर (वय 24, रा. गुरूवर्य नगर, तिरंगा पुलाजवळ, चाळीसगाव) याला मुद्देमाल व वाहनासह पोलीस ठाण्यात आणले. ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना कळवून पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून संशयित आरोपी अक्षय कोतकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
======
1.79 लाखांचा तंबाखू जप्त
नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनने गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पानटपरीतून 1.79 लाखांचा तंबाखू जप्त केला आहे. गुरुवारी रात्री गस्तीवर असताना खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून आयबीएम रोडवरील ताज पान शॉप येथे धाड टाकण्यात आली.तेथे 1 हजार 800 रुपयांचा तंबाखू आढळला. पोलिसांनी आरोपी फैजान शेख उर्फ शेख अमान (24, गिट्टीखदान) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता व त्याच्या घराची झडती घेतली असता तेथून 1.77 लाखांचा तंबाखू आढळला. पोलिसांनी एकूण 1.79 लाखांचा तंबाखू जप्त केला.
