📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ पुसदमध्ये 13 लाखांच्या गुटख्यासह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक
——–
विशेष प्रतिनिधी, यवतमाळ
छुप्या गुटखा तस्करीचा उमरखेड पोलिसांनी भंडाफोड केला आहे. तेलंगणातून पुसदकडे जात असताना पुसद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यात गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून 13 लाखांच्या गुटख्यासह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी युनूस खान अन्सार खान (29 रा. हिमायतनगर) विक्रम शंकर कराळे (23. रा. पुसद) आणि सय्यद अमीर सय्यद खमर (45 रा. हिमायतनगर) या तिघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद पथकाला प्राप्त माहिती नुसार, शनिवारी पहाटे 5 वाजताच्या सुमार उमरखेड-ढाणकी रोडवरुन तेलंगणातील काही अज्ञात व्यक्ती मराठवाड्यातील हिमायतनगर येथून पुसदकडे जात आहेत.
बोलेरो पिकअप वाहनात अवैध गुटखा आणि इतर प्रतिबंधित मालाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, यात जवळ जवळ 13 लाखांचा प्रतिबंधित गुटखा घरात लपवून ठेवल्याचे आढळून आले.
पोलिसांनी या कारवाईमध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक केल्या प्रकरणी बोलेरो पिकअप वाहन (किंमत 10 लाख रुपये) आणि तीन संशयितांना अटक केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अमित उपलप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणामुळे लगतच्या राज्यातून होणाऱ्या अवैध गुटखा आणि इतर प्रतिबंधित अमली पदार्थांची तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. किरकोळ पैशांच्या मोबदल्यात या अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करण्यात येत असते. मात्र या कारवाई मागे असलेले मोठे मासे शोधून काढणे हे आव्हान आता पोलीसांपुढे असल्याचे बोलले जात आहे.
=====
◆ पुण्यात गुटखा साठवणूक प्रकरणी तरुणाला अटक
पुणे : बेकायदेशीरपणे गुटखा साठवणूक केल्या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका तरुणाला अटक केली. त्याला गुटखा साठवून ठेवण्यासाठी खोली उपलब्ध करून देणाऱ्या जागा मालकावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक उमेशचंद्र गुप्ता (वय 25, रा. मुळेवस्ती, बिरदवडी, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राजू केसवड (वय 32, रा. खराबवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस हवालदार मारुती करचुंडे यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 48 हजार 250 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याला गुटखा साठवून ठेवण्यासाठी राजू केसवड याने त्याची जागा कोणताही भाडेकरारनामा न करता उपलब्ध करून दिली. त्यामुळे राजू केसवड याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याचा तपास करीत आहेत.
