📰 *MUMBAI MITRA EXPOSE*
——-
◆ *जुहूमधील पंचतारांकित “नोटावेल सॅम्पन” हॉटेलमधील जेणात मच्छर!*
◆ पालिकेकडून सक्त कारवाईची गरज
◆ हॉटेल व्यवस्थापनामध्येच संभ्रम
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने एका हॉटेलमध्ये जेवणात मृत उंदीर सापडल्यानंतर कारवाईचा देखावा करत 15 हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 13 नोव्हेंबर 2023 रोजी गोरेगावमधील ‘बालाजी प्युअर व्हेज’ या हॉटेलमध्ये एका ग्राहकाच्या जेवणात माशी सापडली. या प्रकरणाचे ‘विशेष वृत्त’ ‘दै. मुंबई मित्र’च्या 14 नोव्हेंबर 2023 रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, तरीही हॉटेलांची नियमित तपासणी करण्याबाबत मुंबई महापालिका निष्काळजी असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. अशीच आणखी एक घटना दोन दिवसांपूर्वीच घडली असून जुहू परिसरातील ‘नोवाटेल सॅम्पन’ या पंचतारांकित या हॉटेलमध्ये एका ग्राहकाच्या जेवणात मच्छर सापडली आहे.या हॉटेलमध्ये शासकीय निर्बंधांची पायमल्ली होत असल्याचेही समजते.
प्राप्त माहितीनुसार,सांताक्रुज पश्चिम येथील जुहू हा परिसर म्हणजे उच्चभ्रू आणि सेलिब्रेटीजचे बंगले असलेला परिसर समजला जातो.त्यामुळे या परिसरात अनेक नामांकित पंचतारांकित हॉटेल्स आहेत.यापैकी एक समजल्या जाणाऱ्या ‘नोवाटेल सॅम्पन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक मोठे ग्राहक येत असतात.या हॉटेलमध्ये 20 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री दहा-साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक ग्राहक गेला होता. त्या ग्राहकाने जेवणासाठी इतर पदार्थाबरोबरच ‘नॉन व्हेज फ्राईड न्युडल्स’चीही ऑर्डर दिली होती. या न्यूडल्समध्ये त्या ग्राहकाला मच्छर आढळली. त्यामुळे ग्राहकाने ही बाब हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी व्यवस्थापनाने याबाबत थातुर-मातूर उत्तरे देऊन ग्राहकाला शांत केले.
सदर ग्राहकाने ‘दै.मुंबई मित्र’शी संपर्क साधल्यावर ही घटना उघडकीस आली.याप्रकरणी हा ग्राहक महापालिका, अन्न व औषध प्रशासन विभाग व इतर संबंधित विभागांकडे लेखी तक्रारी पाठविणार असल्याचे समजते. हॉटेलचे फूड अँड बेवरेज मॅनेजर विनोद सिंग यांच्याशी ‘दै.मुंबई मित्र’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘ही मच्छर जेवणात सापडली नसून डेझर्ट मागविले त्यामध्ये सापडली.’ हॉटेलचे सह-मॅनेजर चंदन गुप्ता यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले की,‘ही मच्छर दरवाजातून आतमध्ये आली व जेवणात पडली.’ यावरून हॉटेलच्या व्यवस्थापनामध्येच एकवाक्यता नाही हे स्पष्ट होते.विनोद सिंग यांच्याकडे हॉटेलच्या जनरल मॅनेजरचा फोन नंबर मागितला असता त्यांनी हा नंबर द्यायला नकार दिला.
—–
◆ याप्रकरणी अधिक चौकशी केली असता अशा प्रकारच्या घटना वरचेवर मोठ्या हॉटेलमध्ये घडत असल्याची माहिती सूत्रांकडून कळली. मात्र, हॉटेल व्यवस्थापन ग्राहकांना थातूरमातुर कारण देत, गोड बोलून त्याची समजूत काढत असल्याने अशा घटना उघडकीस येत नसल्याचेही कळते. पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी पंचतारांकीत हॉटेल व्यवस्थापनाचे ‘मधुर’ संबंध असल्याचेही कळते. त्यामुळे पंचतारांकीत कोणत्याही हॉटेलवर कारवाई होत नाही. या हॉटेल संबंधात ‘दै.मुंबई मित्र’ ने याबाबतीत पालिका व अन्न व औषध प्रशासनाला अधिकृत तक्रार दिली असून यावर आता मुंबई महापालिका काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
—–
◆ यापुर्वी हॉटेलमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये मृत उंदीर आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मुंबईतील 13 विभागांमध्ये हॉटेल्सची तपासणी केली होती त्यापैकी 137 हॉटेल्सना सुधारणा करण्याची नोटीस बजावून त्यांच्याकडून एक लाख सात हजार रुपयांचा दंड ही वसूल केला होता. त्यापैकी परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्या आणि स्वयंपाकगृहात स्वछता न ठेवणाऱ्या मुंबईतील 15 हॉटेल्सवर एफडीएने कारवाई करत या हॉटेल्सना ‘स्टॉप वर्क ऑर्डर’ही दिली होती.