📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ आझाद वस्ती संदर्भात पालिकेचा खुलासा
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘दै.मुंबई मित्र’च्या दि.15 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अंकात ‘मुबंईत आझाद नगर अशीही एक वस्ती’ या ठळक शीर्षकांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानंतर मुंबई महापालिकेला खडबडून जाग आली. पालिकेच्या ‘के-पूर्व’ विभागाने आपला लेखी खुलासा ‘दै.मुंबई मित्र’ला पाठविला असून हा ‘दै.मुंबई मित्र’चा मोठा ‘इम्पॅक्ट आहे.
मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागातर्फे जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी पाठविलेल्या लेखी खुलासा वजा पत्रात (क्र.पीआरओ/3141, दि.21 फेब्रुवारी 2024) म्हटले आहे की, उपरोक्त विषयानुसार, के पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक 77 मध्ये आझाद नगर (गोणीनगर) या ठिकाणी महानगरपालिकेकडून 4 कचरापेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी दिवसातून 2 वेळा नियमितपणे कचरा उचलण्यात येतो. तसेच ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ च्या स्वयंसेवकांमार्फत कचरापेट्यांच्या आजूबाजूचा परिसर नियमित स्वच्छ करण्यात येतो. सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 च्या दरम्यान 2 वेळा नियमित कचरा उचलला जातो. रहिवाश्यांनी कचरा, कचरापेटीत टाकावा यासाठी स्वयंसेवकांकडून नियमित प्रबोधन करण्यात येते. तसेच उघड्यावर शौचास बसणार्यांवर आळा घालण्यासाठी उपद्रव शोधक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. साफसफाई दरम्यानची आणि साफसफाई नंतरची सर्व जिओ टॅग छायाचित्रे उपलब्ध आहेत. आपल्या माहितीस्तव ही छायाचित्रे ई-मेल समवेत जोडली आहेत. तसेच सदर परिसर सध्या अतिरिक्त निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे. असेही या खुलाशात म्हटले आहे.