📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ नागपुरात 54 लाखांचा गुटखा जप्त तर बुलढाण्यात गुटख्याचा ट्रक उलटला
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गुटख्या संदर्भात राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. नागपूरमधील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधामना येथे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये पान पराग, पी पी, आदी गुटख्यांचा सुमारे 54 लाखांचा गुटखा जप्त केला. तर दुसर्या घटनेत गुटख्याची अवैध वाहतूक करणारा आयशर ट्रक नदीच्या पुलावरील कठड्यावर आदळून उलटला व पोलिसांच्या तावडीत लाखो रुपयांचा गुटखा सापडला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या दोन्ही घटना म्हणजे ‘दै. मुंबई मित्र’चा ‘इम्पॅक्ट’ आहे.
◆ वडधामन्यात 54 लाखाचा गुटखा जप्त
नागपूरमधील वाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वडधामना येथे पहाटे 1 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने टीसीआय एक्स्प्रेसच्या कंटेनरमधून 54 लाखांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व सुगंधित पान मसाला जप्त केला. पोलीस सूत्रांनुसार, 17 फेब्रुवारी पहाटे 1 वाजताच्या सुमारास गस्तीवरील गुन्हे शाखेच्या पथकाला वडधामना परिसरात छत्तीसगडच्या रांजनगाव येथून पान पराग, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू हा प्रतिबंधित माल येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाचे प्रभारी एपीआय राहुल सावंत, एचसी तुलसी शुक्ला, एनपीसी अजय पाटील, सोमेश्वर वर्धे, दुर्गादास माकडे यांना वडधामना येथे टीसीआय एक्स्प्रेसच्या कंटेरमधून माल रिकामा करताना आढळून आले. कंटेनरमधील मालाचे सील तुटलेले आढळून आल्याने पथकाने कंटेनरच वाडी पोलीस ठाण्यात आणला. कंटेनर वडधामना मार्गे अमरावतीकडे जात होता.
दरम्यान, एफडीएच्यावतीने अन्न सुरक्षा अधिकारी अमरनाथ यादव सोनटक्के यांनी वाडी पोलिसांना निवेदन देऊन महाराष्ट्र प्रतिबंधित. गुन्हेगारी 2006 अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस केली आहे. पोलिसांनी चालक विशालकुमार सरोज, रा. प्रतापगड (उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले असून वाडीचे ठाणेदार राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. कंटेनरमधून पान मसाला 640 पॅकेट, पान पराग एक्स्ट्रा प्लस पान मसाला 6800 पॅकेट, एक्सपी 10 च्युइंग तंबाखू 6800 पॅकेट, पानपराग प्रीमियम पान मसाला 12 हजार पॅकेट, पीपी च्युइंग तंबाखू 12 हजार पॅकेट, पानपराग पान मसाला (एकूण 70 पॅकेट्स) असा 54,38,752 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
◆ अवैध गुटखा घेवून जाणारा ट्रक उलटला
◆ घटनास्थळावरून लाखो रुपयांचा गुटखा जप्त
बुलढाणा जिल्ह्यातील, देऊळगाव राजा गुटख्याची अवैध वाहतूक करणारा आयशर ट्रक पुलाच्या कठड्यावर धडकून उलटला. ही घटना देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा रोडवरील जांभोरा नजीकच्या नदी पुलावर 18 फेब्रुवारी रोजी घडली. माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून लाखो रुपयांचा गुटखा तसेच इतर मुद्देमाल जप्त केला. दिवसाढवळ्या अवैध गुटखा वाहतूक करणारे मालवाहू आयशर ट्रक क्रमांक एमएच 16 सीडी 2308च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील कठड्यावर ट्रक आदळला़ त्यामुळे, हा ट्रक नदीपात्रात उलटला. त्यामध्ये असलेला लाखो रुपयांचा गुटखा रस्त्यावर पडला. ट्रक चालक मद्यधुंद असल्याने अपघात घडल्याचे घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी तसेच पोलिसांनी सांगितले़ ट्रक उलटल्यानंतर त्यामध्ये असलेला लाखो रुपयांचा गुटखा नदीपात्रात अस्ताव्यस्त पडला होता. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच गुटखा शौकिनांनी एकच गर्दी केली होती. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, भास्कर सानप इतर पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळावरून अवैध गुटखा जप्त केला. रात्री उशीरापर्यंत गुटख्याची मोजमाप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.