📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ यवतमाळमध्ये ‘पुष्पा ‘ स्टाईल गुटखा तस्करी
◆ यवतमाळमध्ये १४ लाखांचा तर नाशिकमध्ये ३६ हजारांचा गुटखा जप्त.
◆ भिवंडीत शेकडो विद्यार्थी पालकांनी घेतली गुटखा विरोधी शपथ
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
“दै. मुंबई मित्र” ने सुरु केलेल्या ‘ ऑपरेशन गुटखा ‘ या गुटखा विरोधी मोहिमेला सध्या प्रचंड यश मिळताना दिसत असून दर दिवसाआड महाराष्ट्रात कुठे ना कुठे गुटखा पकडला जात आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात यवतमाळ आणि नाशिकमध्ये पोलिसांनी मारलेल्या धाडीत १४ लाखांचा तर नाशिकमध्ये ३७ हजारांचा गुटखा जप्त केला. विशेष म्हणजे यवतमाळ मध्ये ‘पुष्पा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या स्टाईलने दुधाच्या टँकर मधून गुटख्याची तस्करी होत होती. यावरून गुटखा तस्कर आता गुटखा तस्करीसाठी वेगवेगळ्या कल्पना वापरत असताना दिसत आहेत. दरम्यान शाळेच्या परिसरातील गुटखा विक्री करणाऱ्या पान टपऱ्या विषयीच्या वृत्तांतामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती होऊ लागली असून भिवंडीतील एका शाळेत गुटखा व सिगरेटची जाहिरात त्याचप्रमाणे ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणाऱ्यांवर बहिष्कार घालण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनीही शपथ घेतली. हे देखील :”दै. मुंबई मित्र”च्या मोहिमेचे यशच म्हणावे लागेल.
————-
यवतमाळमध्ये १४ लाखांचा गुटखा जप्त
यवतमाळ : साऊथचा नायक अल्लू अर्जुनचा काही वर्षांपूर्वी ‘पुष्पा’ नावाच्या चित्रपटात नायक वेगवेगळ्या वेषात चंदनाची तस्करी करतो. त्यावेळी दुधाच्या टँकरमध्ये रक्त चंदनची तस्करी करताना नायक वेगळ्याच लूकमध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या कथेशी जुळणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडली आहे. चक्क दुधाच्या टँकरमधून गुटख्याची तस्करी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न फसला.
वणीच्या गाडगे बाबा चौकात अशाच पुष्पा स्टाईल गुटखा तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. चौकात दुधाची गाडी संशयास्पदरित्या उभी होती. या वाहनाचा संशय आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित गुटख्याची पेटी आढळून आली. याचे पोलिसांनाही आश्चर्य वाटले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा माल नागपुरातून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र आता हा माल मागवणारा कोण होता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे अंमलदार अनिल बेहरानी यांना सकाळी गुप्त माहिती मिळाली की त्याच वाहनातून वणीमध्ये फ्लेवरयुक्त तंबाखूची तस्करी केली जात आहे. त्यावर पोलीस ठाण्याने डीबी पथक पाठवले. दरम्यान, गाडगेबाबा चौकातील निकिता एजन्सीजवळ एक मालवाहू वाहन उभे असल्याचे दिसले. या वाहनाच्या मागे व पुढे दूधगंगा असे लिहिले होते. त्यात दूध वाहून जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी गाडीचा मागील भाग तपासला असता त्यामध्ये ब्रेड आणि दुधाचे ८५ ट्रे होते. पण गाडीत तंबाखूचा उग्र वास येत होता. त्यामुळे त्याने गाडीचा चालक व क्लिनर यांना विचारणा केली असता त्यांनी गाडीत गुटखा असल्याचे सांगितले. यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याच्या 13 पोती सापडल्या. पोलिसांनी सुगंधीत तंबाखूसह एकूण 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणे अंमलदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
————
नाशिकमध्ये पोलिसांच्या धाडीत ३७ हजारांचा गुटखा जप्त; ५ जण अटकेत
नाशिक पोलिसांनी शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी रमजानपुरा, पवारवाडी, आझादनगर, आयशानगर येथे छापा टाकून सुमारे ३७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
गांधीनगर भागातून दिलावर पेट्रोल पंपामागे छापा टाकून रमजानपुरा पोलिसांनी वाल्मिक साळुंके (रा. ४०, महात्मा गांधीनगर द्याने) व नबी मुश्ताक अहमद (२२, रा. द्याने) यांच्या ताब्यातून २९ हजार ९३० रुपयांचा गुटखा जप्त केला. म्हाळदे शिवारात दुसरी कारवाई करण्यात आली. नदीम अख्तर रशीद अहमद (२९, रा. हिलालपुरा) यांच्या पान दुकानावर छापा टाकून ५ हजार ७९४ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
प्रबुध्द नगरातील राजू महिराळे यांच्या पान दुकानावर आयशानगर पोलिसांनी छापा टाकून ३ हजार १५० रुपयांचा तर सैलानी चौकातील मिर्झा तालीब अस्लम बेग (वय २४, रा. शब्बीरनगर) यांच्या मिर्झा पान स्टॉलवर आझादनगर पोलिसांनी छापा टाकून २ हजार १०१ रुपयांचा गुटखा जप्त केला.
चार एकत्रित कारवाईत ३६ हजार ९७५ रुपयांचा गुटखा जप्त करून पाच संशयितांना अटक करण्यात आली. सहाय्यक अधिक्षक तेगबिरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई सचिन बेदाडे, विनोद चव्हाण, नीलेश निकाळे, समाधान सानप व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
——
भिवंडीत गुटखा विरोधी विद्यार्थी व पालकांची शपथ !
भिवंडी : गुटखा सिगरेट यांच्या प्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी असली तरी अप्रत्यक्षपणे त्याची जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जातात. त्यामुळे अशा जाहिराती सर्रासपणे टिव्ही वर सुरू असतात.चित्रपट अभिनेते गुटखा सिगारेट यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून युवा वर्गाला आकर्षित करीत असतानाच मोबाईलवरील ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती अनेक खेळाडू करीत आहेत. त्याकडे युवावर्ग मोठ्या संख्येने आकर्षित होऊन जुगार व नशेच्या विळख्यात अडकत आहेत.युवा वर्गाला यापासून परावृत्त करण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा येथील तुळशीराम पाटील इंग्लिश मीडियम शाळेच्या रौप्य महोत्सवी स्नेह संमेलनात संस्थाध्यक्ष कुंदन पाटील यांनी विद्यार्थी,पालक,शाळेतील शिक्षक यांनी कार्यक्रमा दरम्यान गुटखा सिगारेट यांचे सेवन करणार नाही तसेच ऑनलाईन जुगार खेळणार नाही अशी शपथ घेतानाच अशा वस्तूंची जाहिरात करणाऱ्या चित्रपट अभिनेते यांचे चित्रपट पाहणार नाही तर ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणाऱ्या खेळाडूंचे खेळही पाहणार नाही अशी शपथ घेतली.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी शशिकांत तांबोळी,अविनाश महाजन,शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
