📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू
◆ फेसबुक लाईव्हनंतर हल्लेखोराचीही आत्महत्या
◆ पाच गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती
◆ मॉरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीकडून गोळीबार
◆ गोळ्या मारल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून जीवन संपवले
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. दरम्यान, हल्लेखोरानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर, हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून निषेधार्थ मॉरीसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे.
या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हल्लेखोर मॉरीस याचाही मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अभिषेक यांची हत्या ही पूर्वनियोजित असल्याचा तपास अधिकाऱ्यांचा संशय असून दहिसर पोलीस तसेच क्राइम ब्रांच या प्रकरणी तपास करत आहे
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर गोळीबार होण्यापूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर हा गोळीबार झाल्याचे समजते. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस नावाच्या स्वयंघोषित नेत्याने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्याने हा गोळीबार त्याच्याच कार्यालयात केला. मॉरिस दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. त्याला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे.
