📰 MUMBAI MITRA EXPOSE
——
◆ ईर्शाळवाडीकरांचे पुनर्वसन कधी?
◆ पाच महिन्यांपासून पत्र्याच्या कंटेनरमध्ये होतोय उदरनिर्वाह
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईपासून अवघ्या किमी अंतरावरील ईर्शाळवाडी या नयनरम्य गावावर पाच महिन्यांपूर्वी निसर्गाची कुऱ्हाड कोसळली होती. भूस्खलनाने उद्ध्वस्त झालेल्या या ईर्शाळवाडीवर आजही मृत्युचे सावट दिसत असून या दुर्घटनेत बाचवलेल्यांना महामार्गाशेजारी कंटेनरच्या घरात राहावे लागत आहे. पत्र्याच्या कंटेनरमध्ये आपले जीवन कंठत असलेल्या ईर्शाळवाडीच्या लोकांचा कसाबसा उदरनिर्वाह सुरू असून सरकार मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
19 जुलै 2023 रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी या गावात भूस्खलन झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 29 गावकऱ्यांचा मृत्यु झाला तर 87 जण माती व ढिगार्याखाली बेपत्ता झाले. त्यावेळी सरकारने लवकरात लवकर ईर्शाळवाडीचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. बचावलेल्या गावकऱ्यांसाठी महामार्गाजवळील चौक गावात तात्पुरता आश्रय देत त्यांना कंटेनरची घरे दिली होती. मात्र या कंटेनरच्या वस्तीत गावकर्यांची परवड सुरू आहे. पावसाळ्यानंतरही अद्याप ईर्शाळवाडीच्या पुनर्वसनाचे काम सुरू न झाल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. एकूण 42 कंटेनरमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना आस लागली आहे, ती आपल्या मूळ घराची!
ईर्शाळवाडीचे गावकरी हे पूर्वी 500 रुपयात आपल्या कुटुंबाचा महिनाभर उदरनिर्वाह आरामात करायचे. कारण त्यांची शेती होती. इतर नैसर्गिक उत्पन्न मिळायचे. परंतु भूस्खलनानंतर त्यांची हक्काची शेतीही हिरावून घेतली गेली. अगोदर स्वत: पिकवलेल्या धान्यावर आणि भाजीपाल्यावर जगणाऱ्या गावकऱ्यांना आता सर्व वस्तू विकत घ्याव्या लागत आहेत. त्यांच्या जवळची जमापूंजी आता जवळपास संपली आहे. त्यामुळे त्यांना मोलमजुरी करावी लागते. सदैव जंगलाच्या कुशीत निविड शांततेमध्ये जगणाऱ्या ईर्शाळवाडीकरांना रस्त्यावरील गोंगाट सहन होत नाही. त्यांची मूळ घरे चौपट मोठी होती. मात्र सध्या पत्र्याच्या कंटेनरमध्ये राहताना त्यांना आपण खुराड्यात राहत असल्याचे वाटत असून त्यांची येथे घुसमट होत आहे.
एकतर स्वत:च्या घराबरोबरच स्वत:च्या प्रियजनांना गमावलेल्या ईर्शाळवाडीकरांच्या वेदना अजूनही ताज्याच आहेत. त्यात सरकारकडून होणारी परवड त्यांच्या यातना वाढवत आहे. ते शरीराने कंटेनरमध्ये राहत असले तरी त्यांचे मन मात्र ईर्शाळवाडीत घुटमळत आहे. मात्र ईर्शाळवाडीत गेल्यावर अद्यापही मेलेल्या गुरांचे सांगाडे, मोडकी-उद्ध्वस्त घरे पाहून गावकर्यांचे मन हेलावते. मृत स्वजनांच्या आठवणीने अजूनही त्यांचा ऊर भरून येतो.
कंटेनरमध्ये राहणाऱ्यांचे वेळापत्रकही आता बदलले आहे. पूर्वी गावातील स्त्रिया पहाटे पाच वाजता उठून स्वयंपाक व घरातील इतर कामे करायच्या. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतर सदस्य शेती किंवा मजुरीसाठी जायची तयारी करायचे. आता मात्र बहुतेकजण सकाळी आठ वाजता उठतात. गेल्या 13 वर्षांपासून गावाशी निगडीत असलेल्या अंगणवाडी सेविका पद्मा तांडेल या सध्या कंटनेर कॉलनीतच राहत आहेत. तेथे त्या 16 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांची काळजी घेतात. गेल्या पाच महिन्यांमध्ये बचावलेल्या गावकऱ्यांशी तांडेल यांची जवळीक वाढली आहे. बहुतेक स्त्री-पुरुष गावकरी पद्मा तांडेल समोर आपल्या व्यथा मांडून आपले मन हलके करतात. मात्र त्यांच्या बोलण्यातून निराशेचा सूर डोकावत असतो.
सरकार आपले पुनर्वसन करणार की नाही? याची ईर्शाळवाडीकरांना धाकधूक वाटत आहे. सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ईर्शाळवाडीकरांकडून केला जात आहे.
