📰 MUMBAI MITRA INTERVIEW🎙️💬
———–
◆ कोविडमुळे मेकअप आर्टिस्ट बनली अक्सा शेख
———
सिनेसृष्टीमध्ये सातत्याने नवे चेहरे झळकत असतात. बर्याचदा नवीन अभिनेत्री-अभिनेता हे त्यांच्या विशिष्ट केस रचना, चेहर्याचा मेकअप यामुळे चर्चेत राहतात. त्यांच्या चेहर्याची रंगरंगोटी करणारे खरे हात मात्र वेगळेच असतात आणि ते म्हणजे मेकअप आर्टिस्टचे!
ग्लॅमरस दुनियेतील या चमकत्या चेहर्यांसाठी राबणारे हात मात्र कायम पडद्याआडच असतात. अशीच ग्लॅमरस दुनियेतील या चमकत्या चेहर्यांची रंगत सजविणारी एक यशस्वी मेकअप आर्टिस्ट म्हणजेच अक्सा आदिल शेख!….
पडद्यामागील मेकअप आर्टिस्ट अक्सा आदिल शेख हिची ‘दै. मुंबई मित्र ने’ नुकतीच छोटेखानी मुलाखत घेतली….
मूळची रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावातील अक्सा आदिल शेख ही तरुणी मुंबईमध्ये गोरेगाव या उपनगरात राहायची. अक्साचा आदिल शेखबरोबर निकाह झाल्यावर ती 2017 साली मालाडची रहिवासी झाली.
अक्सा ही मुळात मेकप आर्टिस्ट नव्हती अथवा मेकपशी तिचा दुरान्वये संबंधही नव्हता. तिचा पेशा बँकरचा होता. ‘टाटा सिटी बँकेत’ ती बिझनेस रिलेशन मॅनेजर म्हणून कार्यरत होती. तिला मूल झाल्यानंतर तिने हा जॉब सोडला.
मात्र कधीकधी नशीब अशी कलाटणी मारते की, अचानक एखाद्याचं आयुष्यचं बदलून जातं. 2019 साली कोविडची साथ देशभर पसरली आणि सर्व जगभर लॉकडाऊनची परिस्थिती होती. प्रत्येक जण स्वतःच्या घरात बंदिस्त होता. या लॉकडाऊन मध्येच टाइमपास म्हणून सोशल मिडिया पाहतानाच अक्साला मेकपच्या पोस्ट पाहायची सवय जडली. यातूनच तिच्यामधील मेकअप आर्टिस्टने जन्म घायला सुरुवात झाली…
अक्साने ‘मिनाक्षी दत्ता मेकओव्हर’ यांचा क्लास जॉईन केला. क्लासमधून शिकून बाहेर पडल्यानंतर ग्लॅमरस दुनियेत पाऊल ठेवताना अक्साला बराच संघर्ष करावा लागला. मात्र चिकाटीने संघर्ष करीत तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःचा ठसा उमटवला. अक्साच्या या संघर्षात तिचा पती आदिल शेख यांनी तिला भक्कम साथ दिली, त्यामुळेच ती एवढा पल्ला गाठू शकली.
स्टार प्लस वरील ‘ये रिश्ता क्या कहेलाता है’ या सिरीयल मधील प्रियांका अडवाणीचा मेकअप अक्साने केला आहे. त्याचप्रमाणे कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस ओटीटी-2’मधील फलक नाझ तिचा मेकअपही अक्सानेच केला. मराठी ‘बिग बॉस’मधील स्मिता गोंदकर, स्मिता ठाकरे यांचे मेकपही अक्साच करते. अनेक टीव्ही सिरीयल अभिनेत्रींचा मेकअप अक्सा शेख करत आहे.
अक्सासाठी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गोव्यात ‘मिसेस इंडिया 2021’ स्पर्धा झाली होती. या स्पर्धेची विनर ठरलेल्या नवदीप कौर हिचा लक्षवेधी मेकअपही अक्सानेच केला होता.
‘मिस वर्ल्ड 2022’ या स्पर्धेत ‘बेस्ट कॉस्च्युम अवॉर्ड’ जिंकणार्या स्पर्धकाचा मेकअपही अक्सानेच केला होता. ही तिच्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. हे आपले यश अभिमानाने सांगताना ‘ही संधी मला मॅजिकल मेकओव्हर’मधून मिळाली’ असेही अक्साने नम्रपणे सांगितले. अक्सा शेख ही सध्या ‘फेस स्टोरीज बाय अक्सा’ या नावाने आपला ब्रॅण्ड चालवत असून तिचा पती आदिल शेखची तिला पूर्ण मदत मिळते. ‘दै. मुंबई मित्र’तर्फे अक्साला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!…