📰 MUMBAI MITRA EXPOSE
———–
◆ गोरेगाव, मालाड, कांदिवली, गोवंडी, नालासोपारामध्ये ‘गोल्ड 9000’ची जोमात विक्री!
◆ गोल्डचे उत्पादन रायपूर-छत्तीसगडमध्ये होत असून सावंतकडे जबाबदारी?
◆ मुंबईतील सर्व कामकाज आशू गुप्ता उर्फ शिवप्रकाश गुप्ता आणि विकास गुप्ताकडे?
◆ गुटख्याची वाहतूक अटकेत असलेल्या ‘शौकत’च्या निलेश आणि संतोषकडे?
◆ वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व गाड्या छत्तीसगड आरटीओ पासिंगच्या?
◆ दररोज मुंबईत येतोय 60 ते 70 लाखांचा माल?
◆ गोल्डचे मुंबईतील वितरित
◆ गोरेगाव पश्चिम – याकूब
◆ गोरेगाव – दीपक
◆ मालाड (पठाणवाडी) -फैजल
◆ कांदिवली – ब्रिजेश चौरसिया
◆ गोवंडी – जमील कुरैशी
◆ नालासोपारा- रामविलास यादव, श्रीनाथ सिंग, सलमान शेख
————-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘दै. मुंबई मित्र’ने’ गुटखा विरोधात ‘ऑपरेशन गुटखा’ ही मोहीम सुरू करून जवळपास 3 महिने उलटले आहेत. या मोहिमेअंतर्गत विविध गुटख्याची विस्तृत माहिती, उत्पादन, तस्करी, गुटखा तस्कर, गुटखा वाहतुकीचा मार्ग, गुटखा तस्करांची संपत्ती याविषयी विस्तृत माहिती ‘दै. मुंबई मित्र’ने प्रसिद्ध केली. त्याचबरोबर गुटखा तस्करीसंबंधी तक्रारीही करत पाठपुरावाही केला. याचा एव्हढा इम्पॅक्ट झाला की, चक्क गुटखा तस्करांनी आपले सिंडिकेट बदलले. त्यांच्याप्रमाणे गुटखा वाहतुकीचे मार्ग आणि मोड्स ऑपरेंडीही बदलली.त्याचप्रमाणे या मोहिमेमुळे सतर्क झालेल्या महाराष्ट्र पोलिसांनी जागोजागी धाडी मारत कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला. नुकतेच मुख्य गुटखा तस्कर शौकत अली पठाण याला कळवा पोलिसांनी अटकही केली. शौकतच्या निगराणी खाली सुरू असलेल्या ‘गोल्ड 9000′ गुटख्याच्या वाहतुकीची माहिती आजच्या अंकात प्रसिद्ध केली जात आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘गोल्ड 9000′ गुटख्याचे मुंबईतील सर्व कामकाज आशू गुप्ता उर्फ शिवप्रकाश गुप्ता आणि विकास गुप्ता हे दोघे पाहतात. ‘गोल्ड 9000′ गुटख्याचे उत्पादन रायपूर-छत्तीसगडमध्ये होते. ‘गोल्ड 9000′ गुटख्याचा माल सावंत नावाचा इसम बनवतो. या सावंतबरोबर आशू गुप्ता हा संपर्कात असतो. आशू गुप्ताच्या निगराणी खाली ‘गोल्ड 9000’चे उत्पादन झाल्यावर विकास गुप्ताची भूमिका सुरू होते.
तयार झालेला ‘गोल्ड 9000′ गुटखा वाहतुकीसाठी पोहचविण्याची जबाबदारी विकास गुप्ता याच्यावर असते. गुटखा मुंबईपर्यंत पोलिसांच्या नजरेला न पडता कसा व्यवस्थित वाहतूक होईल, हे विकास गुप्ता पाहतो. ‘गोल्ड 9000′ गुटख्याची वाहतूक अटकेत असलेल्या शौकत अली पठाणच्या देखरेखीखाली होते. शौकतला अटक झाल्यापासून त्याचे दोन विश्वासू साथीदार निलेश आणि संतोष हे पाहात असल्याचे समजते. गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व गाड्या या छत्तीसगड आरटीओ कार्यालयाच्या पासिंगच्या असतात. हा सर्व गुटखा छत्तीसगडहून नागपूरला येतो. तेथून समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईला पोहचवला जातो असे समजते.
‘गोल्ड 9000′ गुटख्याचा दररोज 60 ते 70 लाखांचा माल मुंबईत येतो. मुंबईत आल्यावर त्याचे वितरण गोरेगाव पश्चिम येथे याकूब तर उर्वरित गोरेगावमध्ये दीपक करतो. मालाडच्या पठाणवाडीत फैजल, कांदिवलीमध्ये ब्रिजेश चौरसिया, गोवंडीमध्ये जमील कुरैशी, तर नालासोपारामध्ये रामविलास यादव, श्रीनाथ सिंग आणि सलमान शेख हे ‘गोल्ड 9000′ गुटखा वितरित करतात,अशी माहिती सूत्रांकडून समजते. दरम्यान विकास गुप्ता याने आपले मोबाईल नंबर बदलले असून नवीन मोबाईल क्रमांक वापरत असल्याचेही सूत्रांद्वारे कळते.