📰 MUMBAI MITRA EXPOSE
———–
◆ तुरुंगातून शौकतचे गुटखा रॅकेट ॲक्टिव?
◆ दोन विश्वासू साथीदार निलेश आणि संतोष हे यांच्याकडे नेटवर्कची धुरा?
◆ गुटखा वाहतुकीची जबाबदारी नितेश बोडके व धन्नूकडे?
◆ आशू गुप्ता आणि विकास गुप्ता चे आर्थिक पाठबळ?
◆ कंपन्यांकडून गुटखा तोच विकत घेणार, गुटख्याची वाहतूकही स्वतः करणार आणि विक्रीही स्वतः करणार?
◆ समृद्धी महामार्ग व्हाया पालघर, व्हाया पुणे, व्हाया भिवंडी अशा सर्व मार्गाने गुटखा विक्री पुन्हा सक्रिय?
◆ शौकतला तुरूंगाबाहेर काढण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात असल्याची माहिती?
———
विशेष प्रतिनिधी, मुंबई
11 ऑक्टोबरच्या गुटखा तस्करी प्रकरणी कालवा पोलिसांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी एक प्रमुख गुटखा तस्कर शौकत अली पठाणला भिवंडीतील नारपोली येथे अटक केली. मात्र, शौकत अली तुरूंगातूनच गुटखा तस्करीचे नेटवर्क चालवत असून त्याचे दोन विश्वासू साथीदार निलेश आणि संतोष हे या नेटवर्कची धुरा सांभाळत आहेत. गुटखा वाहतुकीची जबाबदारी नितेश बोडके व धन्नू हे पाहत असून गुटख्यासाठी आशू गुप्ता आणि विकास गुप्ता हे आर्थिक पुरवठा करत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून कळते.त्याचप्रमाणे शौकतला बाहेर काढण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून ‘दै. मुंबई मित्र’च्या हाती लागली आहे. मालवाहतुकीपासून विक्रीपर्यंतचा सर्व कारभार यापुढे मुंबई व परिसरात शौकतच सांभाळणार असल्याने शौकतच गुटख्याचा प्रमुख बनला असल्याचे समजते. यासंबंधीचे ‘दै. मुंबई मित्र’ने सर्वप्रथम दिले होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री खारेगाव टोल नाका येथे कळवा पोलिसांनी नाकाबंदीमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला होता.या ट्रकमध्ये 24 लाखांचा गुटखा होता.अटकेत असलेल्या ट्रकचालकाच्या जबानीवरून पोलीस या गुटख्याच्या तस्करीप्रकरणी शौकत अली पाठांचा शोध घेत होते.परंतु अतिशय धूर्त असलेला शौकत अली पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका जागी थांबत नव्हता. त्याला पकडण्यासाठी दोन-तीन वेळा कळवा पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, प्रत्येकवेळी शौकत पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला. तब्बल दीड महिना पोलिसांना गुंगारा देणाऱ्या शौकतला अखेर 22 नोव्हेंबर 2023 रोजी कळवा पोलिसांनी पकडले व तुरुंगात धाडले.
‘दै.मुंबई मित्र’च्या हाती आलेल्या माहितीनुसार शौकत अली पठाण हा आता तुरुंगात बसूनच आपले गुटखा तस्करीचे नेटवर्क चालवत असल्याचे कळते. त्याचे हे संपूर्ण नेटवर्क त्याचे विश्वासू साथीदार निलेश व संतोष हे सांभाळत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या संबंधित वृत्त ‘दै.मुंबई मित्र’ने दि.24 नोव्हेंबर 2023 च्या अंकात ‘शौकतची धुरा संतोष आणि निलेशकडे’ या शीर्षकाखाली दिले होते. आता शौकतच्या इशाऱ्यावर सुरू असलेल्या गुटखा वाहतुकीची जबाबदारी नितेश बोडके आणि धन्नू हे दोघे सांभाळत आहे. या गुटखा खरेदी-वाहतुकीचा लागणारा संपूर्ण खर्च आशू गुप्ता आणि विकास गुप्ता हे करत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समजते.
शौकतला तुरूंगाबाहेर काढण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात असल्याचेही सूत्रांकडून समजते. शौकतने आपले नेटवर्क अशा पद्धतीने उभे केले आहे की, कंपन्यांकडून गुटखा तोच विकत घेणार, गुटख्याची वाहतूकही तो स्वतः करणार आणि विक्रीही त्याच्याच निगराणी खाली होणार. त्यामुळे एका अर्थाने पाहायला गेले तर शौकत अली पठाण हाच खऱ्या अर्थाने गुटखा तस्करीचा मुंबईतील डॉन बनला आहे.
आता खरेतर मुंबई व ठाणे पोलिसांनी जास्त सक्रीय होण्याची गरज आहे. कारण मध्यंतरी मंदावलेला गुटख्याचा व्यवसाय आता जोमाने सुरू झाला आहे.आता तर गुटखा समृद्धी महामार्ग व्हाया पालघर, व्हाया पुणे, व्हाया भिवंडी असा सर्व रस्त्यांवरून मुंबईमध्ये आणला जात आहे. याला चाप बसणे गरजेचे आहे.पोलीस जेव्हा गुटखा पकडत आहेत. त्याच्या चौपट गुटखा मुंबईत येत आहे.
त्यामुळे ठाणे पोलिसांनी शौकतकडून सर्व माहिती मिळवून लवकरात लवकर त्याचे नेटवर्क उध्वस्त करावे,अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी नाशिकला चांदवड येथे ‘दिलबाग’ गुटखा पकडण्यात आला होता.तो ‘शौकतच्याच रॅकेट’चा होता.त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.एमएचबी पोलिसांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी 16 लाखांचा ‘विमल’ गुटखा पकडला होता.हा गुटखा शौकतच्या निर्देशावरून मुंबईत आणला जात असल्याची माहिती अटकेत असलेल्या टेम्पोचालक रंजनकुमार साहनी याने एमएचबी पोलिसांनी दिली. त्यामुळे एमएचबी पोलिसांनी तपासासाठी शौकतच ताबा घेण्यास काहीच हरकत नसावी. किंबहुना तशी परवानगी मागितली तर शौकतच ताबा त्यांना सहज भेटू शकतो. असे कायदेतज्ज्ञाचे मत आहे. एमएचबी पोलीस अशी इच्छाशक्ती दाखवतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.
——-
गुटखा प्रकरणी दोघे तर पार्टी प्रकरणी 4 पोलीस निलंबित
‘गुटखा तस्करी प्रकरणी पोलीस हवालदार बडतर्फ’ या शीर्षकांतर्गत ‘दै. मुंबई मित्र’च्या 30 नोव्हेंबर 2023 च्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले.या वृत्ताची दखल घेत गुटखा तस्करी तसेच पोलीस ठाण्यात पार्टी करणाऱ्या सहा पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.’दै.मुंबई मित्र’ने गुटख्याविरोधात ‘ऑपरेशन गुटखा’ ही मोहीम सुरू केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी जोरदार कारवाई करत कोट्यवधी रूपयांचा गुटखा जप्त केला असून, गुटखा तस्करांना गजाआड करण्याचे सत्र सुरू केले आहे. गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या मोहसिन शेख बरोबरच नायगाव येथील सशस्त्र दलातील पोलीस शिपाई बाळू रामकृष्ण ढाकणे आणि भांडुप पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई केल्याने मुंबई पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण यामुळे पोलिसांचा गणवेश आणि पद यांचा गैरवापर करता येणार नाही, असा संदेश पोलिसांना गेला आहे.
भांडूप पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार सुनील कंक, पोलीस हवालदार शैलेश पाटोळे, मनोहर शिंदे हे पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) कक्षात पार्टी करताना आढळले. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास हा प्रकार घडला. पार्टी सुरू असताना पोलीस निरीक्षकाचे मदतनीस प्रेमचंद सावंत यांनी देखील या तिघांना अडवले नाही. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठांना समजताच सहायक पोलीस आयुक्तांनी तिघांविरोधात कारवाई करण्याबाबतचा अहवाल पुढे पाठवला. या कारवाईपाठोपाठ पोलीस पाटी लावून गुटखा विक्री करणाऱ्या मोसीम शरीफ शेख यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शेख विरुद्ध पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात 2 लाख 84 हजार रुपयांच्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. नायगाव येथील पोलीस शिपाई बाळू रामकृष्ण ढाकणे यांच्याविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.