📰 MUMBAI MITRA IMPACT
———–
◆ अखेर हिमालय पुलाला मिळणार सरकता जिना
◆ हिमालय पुलाला 5 महिन्यांत मिळणार एस्केलेटर
———
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘सात महिने उलटूनही हिमालय पुलाला सरकता जिना नाही’ या मथळ्याखाली ‘दै.मुंबई मित्र’ने 11 नोव्हेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनल जवळील हिमालय पुलाला सरकता जिना (एक्सेलेटर) नसल्याने वृद्ध व आजारी व्यक्तींना कसा त्रास होतो,यासंबंधीचे वृत्त दिले होते.या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई महापालिकेने छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील हिमालय पादचारी पुलाला एक्सेलेटर (सरकता जिना) बसविण्यासाठी सुमारे सव्वा कोटींच्या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात मंजुरी दिली असून येत्या पाच महिन्यात एक्सेलेटर बसविण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे कळते.हा ‘दै.मुंबई मित्र’च्या बातमीचा इम्पॅकट आहे.
मुंबई महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील हिमालय पादचारी पुलाला एस्केलेटर उभारण्यासाठी 1.29 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एस्केलेटर पाच महिन्यांत वापरासाठी तयार होईल. मार्च 2023 मध्ये पूल पादचाऱ्यांसाठी खुला झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पालिकेला सात महिने लागले आहेत.
पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 14 मार्च 2019 रोजी हिमालय पूल कोसळल्यानंतर मे 2021 मध्ये पुलासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. प्रकल्पाची मूळ किंमत 6.03 कोटी रुपये होती. पालिकेच्या दस्तऐवजानुसार, काम चालू असताना, रेल्वेने पालिकेला पुलासाठी एस्केलेटर बसवण्याची सूचना केली होती.
पालिकेने यापूर्वी डी.एन.रोडच्या फूटपाथच्या बाजूला एस्केलेटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गात भूमिगत सुविधा आल्याने फूटपाथची कल्पना रद्दबातल ठरल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यानंतर हा आराखडा अंतर्गत रस्त्यावर हलविण्यात आला. एस्केलेटरच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याची बातमी ‘दै.मुंबई मित्र’ने 11 नोव्हेंबरला दिली होती.
गेल्या आठवड्यात मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार, एस्केलेटरची स्थापना मार्च 2024 पर्यंत पूर्ण केली जाईल. हिमालय पूल 14 मार्च 2019 च्या रात्री कोसळला होता, त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता आणि 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. दररोज 50,000 हून अधिक रेल्वे प्रवासी या पुलाचा वापर करतात.