📰 DAILY MUMBAI MITRA IMPACT
———
◆ जिंतूरमध्ये 12 लाखांचा गुटखा पकडला
◆ नवनाथ शहाजी डोंबे व शेख मुख्तार शेख सत्तार विरोधात गुन्हा दाखल
——-
विशेष प्रतिनिधी, जिंतूर
‘दै. मुंबई मित्र’च्या ‘ऑपरेशन गुटखा’ मोहिमेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून महाराष्ट्रभरात पोलीसांकडून गुटखा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. या पार्श्वभुमीवर जिंतुर पोलीस ठाण्याने खाद्यपदार्थांच्या आड गुटखा तस्करी करणाऱ्या ट्रक वर कारवाई केली असून 12 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. राज्य शासनाने बंदी घातलेला व नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असलेला विविध कंपन्यांचा गुटखा रात्रीच्या वेळी एका चारचाकी वाहनांमध्ये भरून शहरांमध्ये आणला जात होता.
जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरूध्द काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी औंढा टी पॉईंटवर शनिवारी (दि. 28) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास 12 लाख 60 हजारांचा गुटखा व 7 लाख रूपये किंमतीचे वाहन असा एकूण 19 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. जिंतूर पोलीस हे ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली की, औंढा येथून जिंतूरकडे एका चारचाकी वाहनात राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा येत आहे. यावेळी पोलिसांनी औंढा टी पॉईंटवर सापळा रचून औंढा येथून जिंतूरकडे येणारे वाहन क्रमांक एम.एच.37 टी 0357 शिवाजीनगर भागात आडविले, त्यात तालुक्यातील बलसा येथील गुटखा माफिया नवनाथ शहाजी डोंबे हा बसलेला दिसल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला व त्यांनी सदरील गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा आढळून आला.
कारवाईत पोलिसांनी 12 लाख 60 हजार रूपयांचा गुटखा व 7 लाख रूपये किमतीचे वाहन असा एकूण 19 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुटखा विक्रेता नवनाथ शहाजी डोंबे (रा. बलसा) आणि शेख मुख्तार शेख सत्तार (रा. जिंतूर) या दोघांविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना जिंतूर न्यायालयासमोर हजर केले.
