📰 MUMBAI MITRA EXPOSE
———–
परराज्यातील मोस्ट वॉन्टेड अट्टल गुन्हेगारांच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गणेश भोसले उर्फ महाराज व संजू डोकरे उर्फ अमित उर्फ दद्दू उर्फ सुका यांना अटक
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोस्ट वॉण्टेड असलेल्या दोघा अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या अखेर मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. गेल्या सात वर्षांपासून हे दरोडेखोर पोलिसांना गुंगारा देत पसार होत होते. अखेर मुंबई पोलिसांच्या युनिट नऊच्या पथकाने मोठ्या शिताफीने मालाड पूर्व परिसरातून जेरबंद केले आहे. गणेश पांडुरंग भोसले उर्फ महाराज उर्फ पप्पू (वय 47, रा. चित्रकूट सोसायटी, नाशिक), संजू सुनका डोकरे उर्फ अमित उर्फ दद्दू उर्फ सुका (43, रा. वडारीपाडा, नल्ला बाबूजी चाळ, मालाड पूर्व, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा अट्टल दरोडेखोरांची नावे आहेत.गणेश भोसले हा उत्तर प्रदेशातील कोखराज पोलिस ठाण्यातील युपी गँगस्टर ॲक्ट या गुन्ह्यात मोस्ट वॉण्टेड आहे. तसेच,हैदराबाद येथील मुथ्थुट फायनान्सच्या 44 किलो सोन्याची जबरी चोरी केली होती. महाराष्ट्रासह परराज्यात गणेश आणि संजू यांच्यावर दरोड्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट नऊच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणानुसार दोघांना मालाड पूर्व भागातून सापळा रचून अटक केली.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त शशिकुमार मीना, उपायुक्त अमोघ गावकर, सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दया नायक, सचिन पुराणिक, दीपक पवार, सहाय्यक निरीक्षक उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, नरेंद्र पालकर, संतोष काकडे, सुभाष शिंदे, सुनील म्हाळसंक, संजय भोसले, जितेंद्र शिंदे, भिकाजी खडपकर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.