सध्या बॉलिवूडमध्ये सीक्वलचा ट्रेंड आहे. नुकतंच ‘ओएमजी’ आणि ‘गदर’ या सिनेमांचे सीक्वल प्रदर्शित झाले. ‘गदर 2’ने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ‘गदर 2’च्या यशानंतर आता बॉलिवूडमध्ये सीक्वलची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वीच सुभाष घई यांनी ‘खलनायक 2’ बाबत भाष्य केलं होतं. आता ‘धडकन’ या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वलची चर्चा रंगली आहे.
2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ चित्रपटाने चाहत्यांना वेड लावलं होतं. अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘धडकन’ चित्रपटातील त्रिकुट आणि फिल्मी लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावली होती. आता पुन्हा एकदा हे त्रिकुट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धडकन’च्या दिग्दर्शकांनी ‘धडकन 2’बाबत एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक धर्मेश दर्शन म्हणाले, मला ‘धडकन’चे निर्माते रतन जैन यांच्याकडून ‘धडकन 2’साठी विचारणा झाली आहे. हा एक क्लासिक चित्रपट आहे. ‘गदर 2’च्या यशानंतर मला पुन्हा ‘धडकन 2’ साठी विचारणा होत आहे. ‘धडकन 2’साठी धर्मेश दर्शन यांनी निर्मात्यांसमोर काही अटीदेखील ठेवल्या आहेत. धर्मेश दर्शन यांना ‘धडकन 2’च्या स्टार कास्टबद्दलही विचारण्यात आलं. ‘धडकन 2’मध्येही शिल्पा शेट्टी, सुनिल शेट्टी आणि अक्षय कुमार असणार का? विचारल्यावर ते म्हणाले, या चित्रपटाच्या स्टार कास्टबाबत मी अद्याप विचार केलेला नाही.
