सध्या अनेक मराठी सिनेमांचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरू आहे. ‘डेट भेट’, ‘व्हिक्टोरिया’सारखे अनेक चित्रपट लंडनमध्ये शूट झाले आहेत. तर आता प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सुकन्या मोने, शिवानी सुर्वे हे मराठी कलाकार लंडनमध्ये आगामी सिनेमांचं शूट करत आहेत. या सगळ्यात मराठी अभिनेत्री दीप्ती देवीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती अभिनेता स्वप्नील जोशीसोबत लंडनच्या रस्त्यावर रोमान्स करताना दिसत आहे.
‘नाळ’, ‘घर बंदुक बिर्यानी’ फेम अभिनेत्री दीप्ती देवी सध्या लंडनमध्ये आहे. ती आगामी एका मराठी सिनेमात स्पप्नील जोशीसोबत स्क्रीन शेअर करत आहे. दरम्यान तिने लंडनच्या रस्त्यावर रात्री स्वप्नीलसोबत चालतानाचा एक रोमँटिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘जहाँ दोस्तो ने मिलकर लाई है ये बहार’ असं कॅप्शन तिने दिलं आहे. तसंच स्वप्नीलसोबत शूट करायला मजा आली असंही तिने म्हटलं आहे. दीप्तीच्या या व्हिडिओवर स्वप्नीलनेही कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. दीप्ती आणि स्वप्नीलची जोडी पहिल्यांदाच सिनेमासाठी एकत्र आली आहे. या सिनेमात सागर कारंडे, सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, नम्रता गायकवाड यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय स्वप्नीलचा ‘जिलबी’ हा सिनेमाही प्रदर्शित होतोय.
