📰 MUMBAI MITRA EXPACT
———–
◆ मनोर पोलीस ठाणे हद्दीत गुटख्याच्या ट्रकवर कारवाई
◆ ठाणे ग्रामिण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधीत गुटखा जप्त
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘दै.मुंबई मित्र’च्या गुटखा विरोधी मोहिमेला चांगलेच यश मिळत असून सातत्याने गुटखा पकडल्याचे वृत्त येत आहे. ‘ऑपरेशन गुटखा’ मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अनेक गुटख्यांचे उत्पादन, वाहतूक उत्पादक व त्यांची पार्श्वभूमी मालमत्ता यांची सविस्तर माहिती ‘दै. मुंबई मित्र’ने प्रसिद्ध केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथील सुरत वरून महाराष्ट्रात हा ट्रक येत होता. ट्रकमध्ये राजश्री, कमलापसंद, रजनीगंधा, डबल झीरो जर्दा इत्यादी गुटखा असल्याची सुत्रांची माहिती आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालघर पोलीसांच्या हद्दीमध्ये येणाऱ्या मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई झाली. गुन्हा मनोर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून याचा संपुर्ण तपास ठाणे ग्रामिण पोलीसांची स्थानिक गुन्हे शाखा करत असल्याचे समजते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा संपुर्ण माल रमेश मोर्याचा असल्याचे समजते.
राज्याला वेगाने आपला अजगरी विळखा घालत असलेल्या गुटख्याविरुद्ध ‘दै. मुंबई मित्र’ने आवाज बुलंद करत 31 जुलै 2023 पासून ‘ऑपरेशन गुटखा’ ही मोहीम सुरू केली. ‘मुंबईत प्रतिबंधित गुटखा येतो तरी कसा?’ या वृत्तांत पासून या मोहिमेची सुरुवात झाली. गुटखा मालिकेमध्ये आतापर्यंत अनेक गुटख्यांच्या उत्पादन, वितरण, मालक व वितरक त्यांच्या मालमत्ता त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडूनही गुटख्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू होऊन अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांचा गुटखा महाराष्ट्रभरात पकडला गेला त्यानंतर ‘दै. मुंबई मित्र’ ने गृह खाते व अन्न व औषध प्रशासन तसेच उच्च पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
————-
कोण आहे रमेश मौर्या?
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोर येथे पकडण्यात आलेला गुटख्याचा संपुर्ण माल रमेश मोर्याचा असल्याचे समजते. ‘दै. मुंबई मित्र’ने 31 ऑगस्ट रोजी सुत्रांच्या माध्यमातून मिळालेली माहिती प्रसिध्द केली होती. मिळालेल्या माहितीनुसार ‘विमल’, ‘राजश्री’ आणि ‘कमला पसंद’ या गुटख्यांचा मुंबई नाशिकचा प्रमुख डीलर रमेश मौर्या उर्फ रमेश कालिया उर्फ रमेश गुप्ता हा आहे. त्याचे खरे नाव रमेश मौर्या असून तो उत्तर प्रदेशातील जौनपुरचा असल्याची सुत्रांची माहिती आहे. गेली बरीच वर्ष गुजरात मधील सुरत शहरात तो स्थायिक झाला आहे. सुरुवातीला सुरतमध्ये तो सुपारी आणि सिगरेटची विक्री करायचा, त्याचे ‘गल्ला दुकान’ म्हणून ओळखले जायचे. या दरम्यान तो ‘राजश्री’ गुटख्याच्या नजरेत आला आणि सुरतचा डीलर झाला. हळूहळू त्याने राजश्रीच्या सुरतमधील डिस्ट्रीब्यूटर आणि कालांतराने सीएनएफ म्हणजेच मुख्य सूत्रधार बनला असे समजते.