📰 MUMBAI MITRA EXPOSE
———–
◆ डब्यांवर लिहिलेल्या चुकीच्या क्रमांकामुळे चाकरमन्यांची गाडी चुकली
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
रेल्वे प्रशासन यावर्षी गणेशोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे अतिरिक्त गाड्या चालवत आहे. मात्र यात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. महत्वाच्या स्थानकावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची उद्घोषणा योग्य प्रकारे केली जात नाही.त्याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे महत्वाच्या स्थानकावर प्रवासी मदत कक्षाची उभारणी करणे आवश्यक होते.तशी काहीच सोय न केल्याने प्रवाशांची गैरसोय झालेली आहे. चार महिने अगोदर कसेबसे आरक्षित तिकीट मिळवायचे, नाही मिळाल्यास दुप्पट तिप्पट भावाने दलालांकडून विकत घ्यायचे.
रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे गाडी चुकलेल्या प्रवाशांनी आपल्या त्रासाबद्दल दाद नेमकी कुणाकडे मागायची असा प्रश्न विचारण्याची वेळ या दोन दिवसांत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पडला आहे.रेल्वेच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे 4 ते 5 प्रवांशांची गाडी चुकल्याचा प्रकार नुकताच घडला.
विनोद सुरेशराव मोरे यांच्याकडे दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस-ट्रेन क्रमांक 10105 या गाडीची कन्फर्म तिकिटे होती. त्या गाडीवरील ट्रेन क्रमांक ठराविक बोगीवर चुकीचा टाकला गेल्याने, या चुकीने त्यांच्यासहीत सुमारे 4 ते 5 कन्फर्म तिकीट असलेल्या कुटुंबीयांची ही ट्रेन 16 तारखेला चुकली. दिवा सावंतवाडी गाडीचा गाडीवरील 10105 क्रमांक नमूद करून ही चूक सुधारणे आवश्यक होते. रेल्वेकडूनही या गाडीबाबत ठराविक कालांतराने उद्घोषणा करून प्रवाशांना सूचित करणे आवश्यक होते.मात्र रेल्वेकडून याबाबतीत कोणतीही गंभीर दखल घेण्यात आलेली नाही.
