प्रतिनिधी, मुंबई
कोकणातील गणेशोत्सव चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यासाठी चाकरमानी अनेक महिने आधी रेल्वेचे तिकीट आरक्षित करतात, पण त्या दृष्टीने रेल्वेकडून योग्य नियोजन केले जात नाही, यंदा कोकणरेल्वेच्या या नियोजनशून्य कारभाराचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध एका प्रवाशाने सांगितले की, कोकणरेल्वेच्या नियोजनाच्या अभावामुळे सर्व ट्रेन 5 ते 6 तास उशिराने धावत आहेत. वारंवार मागणी करूनही सर्व सुपरफास्ट एक्स्प्रेस मिरज मार्गे वळवल्या जात नाहीत आणि मालगाड्या सुरू ठेवल्या जात आहेत. परिणामी चाकरमान्यांना 18 तास प्रवास करावा लागतो, आता दिवा-सावंतवाडी पॅसेंजर 40 मिनिटे विलवडे स्थानकात आणि मांडवीला, वेरवलीला थांबवली होती. त्यामुळे लोक सावंतवाडीपर्यंत पोहोचणार केव्हा? म्हणजे चाकरमान्यांनी 300 रु.चे तिकीट काढून मुंबईतून यायचे आणि स्टेशनला उतरल्यावर 1 हजार रुपये रिक्षाचालकाला देऊन घरी जायचे,असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे.
दरम्यान, कोकण रेल्वेच्या प्रशासनाने सदर विलंब मेगा ब्लॉकमुळे असून त्याबद्दल आधी माहिती जाहीर केलेली असल्याचे सांगितले तसेच हा विलंब तासाभराचा असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.