📰 MUMBAI MITRA EXPOSE
———–
◆ जालन्यामध्ये गुटख्याचा हैदोस
◆ राज निवास, गोवा, विमल, आरएमडी, अरब, हिरा, पान पराग, रजनीगंधा गुटख्याच्या विक्री प्रमाण अधिक
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘दै.मुंबई मित्र’च्या गुटख्याविरोधी मोहिमेला दिवसेंदिवस धार चढत आहे. ‘ऑपरेशन गुटखा’ मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अनेक गुटख्यांचे उत्पादन, वाहतूक उत्पादक व त्यांची पार्श्वभूमी मालमत्ता यांची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. सूत्रांनुसार मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये गुटखा प्रचंड प्रमाणावर विकला जातो. केवळ एका जिल्ह्यातील गुटख्याची दर महिन्याला करोडो रुपयांमध्ये उलाढाल होते. संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी दर दोन दिवसांनी एक ट्रक गुटखा येतो. यात सर्व प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडचे गुटखे असतात. गुटख्याचा ट्रक सतीश जैस्वाल ऊर्फ लाला नावाचा व्यक्ती मागवतो हा सर्व गुटख्याचा माल जालन्यातील एमआयडीसी नागेवाडी, लाला गोदाम, वकारी फार्म हाऊस येथे साठविला जातो. त्यानंतर तो छोट्या-छोट्या टेम्पोंमध्ये भरून ठिकठिकाणी वितरित केला जातो.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील गुटख्यांच्या वितारकांमध्ये सचिन गुप्ता हा अंबडचा मुख्य डीलर आहे. तो जय ट्रेडर्स या नावाने गुटख्याचा माल सप्लाय करतो. किशोर पैठणे हा काजळा विभागाचा गुटखा वितरक आहे. कैलास धाड उर्फ कैलास किराणा हा कुंभार पिपंळगाव येथील गुटख्याचा वितरक आहे. रहीम तांबोळी हा शाहगडचा गुटखा वितरक असून तो सहारा ट्रेडर्स या नावाने आपला कारभार चालवतो. अजीम पठाण, ओम मुंदडा, अयुब तांबोळी हे तिघे परतुरचा गुटखा कारभार पाहतात. सय्यद अहमद हा सिद्ध काळेगाव – रामनगर येथे गुटखा वितरक आहे. काटकर बदनापूरचा वितरक आहे. राम देठे हा कार्ला परिसरात गुटखा वितरक आहे.दिनेश जंबाडे हा धनसांवगीचा वितरक आहे. फिरोज बागवान हा रंजनी परिसरात गुटखा सप्लाय करतो असे समजते. जालनामध्ये ‘राज निवास’, ‘गोवा’, ‘विमल’, ‘आरएमडी’, ‘अरब’, ‘हिरा’,‘पान पराग’, ‘रजनीगंधा’ हे गुटख्याचे ब्रँड सर्वात जास्त प्रमाणात विकले जातात.जालना पोलिसांनी या सर्व प्रकारची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी असे जनतेचे मत आहे.कारण या गुटख्याच्या विळख्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. भविष्यातील सर्वात जास्त कँसर पेशंट जालना जिल्ह्यात आढळले तर नवल नाही.
