📰 DAILY MUMBAI MITRA EXCLUSIVE
◆ ‘बडेमिया हॉटेल’ला टाळे किचनमध्ये आढळले झुरळ अन् उंदीर
◆ ७६ वर्षे जुनं असलेल्या बडेमिया या रेस्टॉरंटकडे फूड सेफटी अँड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाचं लायसन्स नसल्याचे समोर
———-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दक्षिण मुंबईतील बडेमिया या प्रसिद्ध रेस्टॉरंटवर अन्न आणि औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. एफडीएने हॉटेलवर छापा मारला त्यावेळी तपासणीदरम्यान हॉटेलमधील गलिच्छपणा उघड झाला आहे. मुंबईतील खाद्य प्रेमींच्या आवडीचे ठिकाण असलेल्या या ७६ वर्षे जुन्या फूड जॉइंटवर एफडीएची काही तास छापेमारी सुरू होती. छापेमारीच्या वेळी हॉटेलच्या किचनमध्ये झुरळे आणि उंदीर आढळले. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बडेमिया हॉटेल बंद केलं आहे. याआधी बडेमिया या हॉटेलच्या स्वच्छतेसंबंधित अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतरच एफडीएने ही कारवाई केली आहे.
७६ वर्षे जुनं असलेल्या बडेमिया या रेस्टॉरंटकडे फूड सेफटी अँड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाचं लायसन्स नसल्याचंही समोर आले. मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची छापेमारी आणि तपासणी सुरू आहे. ज्या हॉटेलवर छापे टाकण्यात आले त्यात बडेमियाचा देखील समावेश आहे. तसेच अन्न व सुरक्षेचे नियम न पाळणारे तीन हॉटेल बंद करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यात गोवंडी येथील क्लाऊड किचन स्वरूपातील हायपरकिचन, माहीम येथील मुंबई दरबार आणि वांद्रे येथील’ पापा पेंचो दा ढाबा’ यांचा समावेश आहे. हॉटेल्सच्या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या १०० नियमांपैकी किमान ९० नियम पाळावे लागतात.
मात्र, या तपासणीत अनेक हॉटेल्समध्ये अस्वच्छतेची मुख्य तक्रार सर्रास दिसून आली आहे. दरम्यान, यापुढेही ही मोहीम अशीच सुरू राहणार असून दोषी आढळलेल्या हॉटेलवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
