📰 DAILY MUMBAI MITRA EXPOSE
——
◆ वसई-विरार घर घोटाळा
◆ कर्ज देणाऱ्या बँका व पतपेढ्या अडचणीत?
———-
विशेष प्रतिनिधी, वसई
वसई-विरारमधील 55 अनधिकृत इमारतींचा घर घोटाळा उघडकीस येण्यास ज्या इमारतीपासून सुरुवात झाली त्या ‘रुद्रांश’ इमारतीला तब्बल 13 हुन अधिक बँका आणि पतसंस्थानी इमारत बांधण्यासाठी आणि रहिवाशांना कर्ज दिले आहे.या कर्ज देण्याऱ्या 13 बँका पोलिसांच्या रादरवबर आल्या असून त्यांनी कर्जे देताना इमारतीचा कायदेशीरपणाची पडताळणी केली नाही काय? असा प्रश्न उपस्थित झाला असून या दिशेने पोलीस तपास करणार आहेत.
वसई-विरार मधील 55 बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणी विरार पोलिसांनी ऑगस्ट 2023च्या पहिल्या आठवड्यात 3 हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्याचा पर्दाफाश केला.या घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार प्रशांत पाटीलसह त्याच्या 4 साथीदारांना पोलिसांनी अटक केली.या पाच जणांच्या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे वसई-विरार नालासोपारामध्ये अनेक अनधिकृत इमारती बांधल्या.त्याचप्रमाणे इतर विकासकांनाही बनावट कागदपत्रे पुरवली.याप्रकरणी वसई-विरारच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 36 हुन अधिक गुन्ह्यांची नोंद केली आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यापासून दै.मुंबई मित्रसातत्याने याचा पाठपुरावा करत आहे.या प्रकरणी पालिका अधिकारीप्रमाणेच या बेकायदेशीर इमारतींना कर्जे पुरविणाऱ्या बँका व पतपेढ्यांमधील अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता दै.मुंबई मित्र’ने यापूर्वीच वर्तविली होती.
