📰 DAILY MUMBAI MITRA EXPOSE
———-
◆ वसई-विरार घर घोटाळा; अनधिकृत फ्लॅटची विक्री सुरूच!
◆ आमिषाला ग्राहकांनी बळी पडू नये; ‘दै. मुंबई मित्र’चे आवाहन
———-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
सध्या प्रचंड गाजत असलेल्या वसई-विरारमधील 55 अनधिकृत इमारतींच्या घर घोटाळा प्रकरणातील काही इमारतींच्या विकासकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तरीही ‘त्या’ 55 पैकी काही इमारतींच्या अनधिकृत फ्लॅटची विक्री वसई-विरारमधील दलालांकडून सुरू असल्याचे माहिती सूत्रांकडून कळते. हे दलाल फ्लॅटच्या किमतींमध्ये भरमसाठ सवलत देण्याचे आमिष या दलालांकडून ग्राहकांना दाखविले जात असून लोकांनी या फसव्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन ‘दै. मुंबई मित्र’तर्फे करण्यात येत आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विरार पोलिसांनी 3 हजार कोटी रुपयांचया घर घोटाळ्याचा पर्दाफाश करत या घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार प्रशांत पाटीलसह त्याच्या 4 साथीदारांच्या मुसक्या आवळल्या या पाचजणांच्या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे वसई-विरार नालासोपारामध्ये अनेक अनधिकृत रहिवासी इमारती बांधल्या. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 हून अधिक इमारतींच्या विकासकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या या महा घरघोटाळ्यातील अनधिकृत 55 इमारतींवर पावसाळ्यानंतर पालिकेकडून तोडक कारवाई होण्याची दाट शक्यता असल्यामुळे येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती केवळ 55 इमारतींपुरतीच मर्यादित राहणार नसून जवळपास 100 हून अधिक इमारती बेकायदेशीर ठरण्याची दाट शक्यता पोलिसांच्या तपासावरून वाटत आहे.
मात्र तरीही या 55 अनधिकृत इमारतींपैकी काही इमारतींमधील रिकामी राहिलेले अथवा नवीन बांधकाम झालेल्या इमारतींमधील फ्लॅट येथील स्थानिक एजंटांद्वारे विकण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. हे फ्लॅट विकण्यासाठी हे एजंट नवीन ग्राहकांना 80 ते 90 टक्के गृहकर्ज बँकांकडून मिळवून देण्यासाठी मदत करण्याची ऑफर देतात. त्याचप्रमाणे नवीन इमारतींमध्ये अवघ्या दोन-तीन महिन्यांमध्ये फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन ग्राहकांना दिले जाते. एजंटस्कडून इमारतीला महारेरा नोंदणीचे प्रमाणपत्र दाखवले जाते. शिवाय ग्राहकांना पंतप्रधान घरकुल योजनेतून दोन ते अडीच लाख रुपयांचे सरकारी अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले जाते. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र या आमिषाला ग्राहकांनी बळी पडू नये असे आवाहन ‘दै. मुंबई मित्र’ करत आहे.
