भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरूवारी महिला क्रिकेटर्सना पुरुषांसारखे एकसमान मॅच फिस देण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यासंबंधीचे एक ट्विट केले. महिला क्रिकेट खेळाडूंना यापुढे पुरुषांसारखेच वेतन दिले जाईल, असे ते म्हणाले. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी अध्यक्षपदाचा पदभार सोडल्यानंतर काही दिवसांतच बीसीसीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जय शाह गुरूवारी एका ट्विटमध्ये म्हणाले – मला लैंगिक समानतेच्या दिशेने पहिले पाऊल उचलताना खूप आनंद होत आहे. आम्ही भारतीय महिला संघाच्या कॉन्ट्रॅक्ट केलेल्या खेळाडूंसाठी एकसमान धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत क्रिकेटमध्ये लैंगिक समानता लागू करण्याच्या दिशेने एका नव्या युगात प्रवेश करत आहे. यापुढे पुरुष व महिला क्रिकेटर्सना एकसमान मॅच शुल्क अदा केले जाईल.
उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय पुरुष संघाच्या खेळाडूंना प्रति टेस्ट मॅच 15 लाख, तर एकदिवसीय सामन्यासाठी 6 व टी-20 सामन्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये मॅच फीस मिळते. बोर्डाच्या नव्या निर्णयानंतर कंत्राटी महिला खेळाडूंनाही यापुढे एवढेच मॅच शुल्क मिळेल. यामुळे महिला खेळाडूंची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत मिळेल.
बीसीसीआय पुरुष खेळाडूंसारखे महिला खेळाडूंसोबतही वार्षिक करार करते. पण दोघांच्या मॅच फीसहून कराराच्या शुल्कात मोठे अंतर आहे. भारतीय पुरुष क्रिकेटर्सना “ए+” कॅटेगरी अंतर्गत वार्षिक 7 कोटी, “ए” कॅटेगरीसाठी वार्षिक 5 व ग्रेड “बी” अंतर्गत वार्षिक 3 व ग्रेड सी साठी वार्षिक 1 कोटी रकम मिळते. पण पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या कराराची रकम फार कमी आहे. पुरुष क्रिकेटर्ससाठी कराराच्या 4 कॅटेगरी आहेत. पण महिला खेळाडूंसाठी त्या अवघ्या 3 आहेत. ए कॅटेगरीच्या खेळाडूंना वारषिक 50 लाख, तर बी कॅटेगरीच्या खेळाडूंना वार्षिक 30 लाख रुपये फिस दिली जाते. याऊलट सी कॅटेगरीतील करार झालेल्या खेळाडूना वार्षिक 10 लाख रुपये मिळतात.