नवी दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर केंद्र सरकार आता त्यांना आणखी एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेन्ट फॅक्टर वाढवण्याच्या मागणीकडे केंद्र सरकार लक्ष देणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढवण्यावर विचार केला जात आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेन्ट फॅक्टर वाढवला जाऊ शकतो. सध्या फिटमेन्ट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18000 रुपये आहे. फिटमेन्ट फॅक्टर 2.57 पट निश्चित करण्यात आलेला आहे. तो 3.68 पट करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी होती. असे झाल्यास किमान वेतन 26000 रुपये होईल. पण आता नवीन चर्चा अशी आहे की तो वाढवून 3 पट करण्यावर सहमती होऊ शकते. मात्र यावरील कोणताही निर्णय पुढील वर्षीच्या बजेटनंतरच होऊ शकतो.
एका उदाहरणातून समजून घ्या – जर फिटमेन्ट फॅक्टर वाढवून 3 पट केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18000 रुपये आहे, तर भत्ते सोडून त्याचे वेतन होईल 18000X2.57 = 46260 रुपये. शिफारशी मान्य केल्या तर पगार 3.68 पट होईल. म्हणजेच पगार 26000X3.68= 95680 रुपये. यामुळे कर्मचाऱ्यांना बंपर फायदा होईल. तर 3 पट फिटमेन्ट फॅक्टरमुळे पगार 21000X3=63000 रुपये होईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करण्यात फिटमेन्ट फॅक्टरची भूमिका महत्वाची असते. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार भत्त्यांशिवाय त्यांचे मूळ वेतन आणि फिटमेन्ट फॅक्टरने ठरतो. हा तो फॅक्टर आहे ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन अडीचपट वाढते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार फिटमेन्ट फॅक्टर 2.57 आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवताना महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घरभाडे भत्त्यासह मूळ वेतन फिटमेन्ट फॅक्टर 2.57 ला गुणून काढला जातो.