तळोजा
तळोजा येथील घोट गावात राहणाऱ्या बाळाराम बाबू पाटील याने वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कावरून सुरू असलेल्या वादातून सख्या लहान भावावर आपल्या दोन मुलांच्या मदतीने कोयत्याने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी बाळाराम पाटील व त्याची दोन मुले नितीन पाटील व मनोज पाटील या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
घोट गावात राहणारा आरोपी बाळाराम पाटील याला चार बहिणी व निवृत्ती पाटील हा लहान भाऊ असून त्याच्या तीन बहिणी विवाहित आहेत. त्याची लहान बहीण सुनंदा कोळेकर (३८) पतीने सोडल्याने तळोजा येथील वडीलोपार्जित घरामध्ये भाऊ निवृत्ती पाटील याच्या कुटुंबासोबत राहत आहे. निवृत्ती पाटील याच्या घोट गाव पिंपळपाडा येथील वडिलोपर्जित जागेमध्ये १५ घरे बांधण्यात आली असून ही घरे त्याने भाड्याने दिली आहेत. त्याचप्रमाणे घोट गाव स्मशानभूमीजवळ असलेल्या जागेमध्ये बाळाराम पाटील याच्या मालकीच्या चाळी आहेत. वडिलोपर्जित जागेच्या हक्कावरून या तिघा भावंडामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरू आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी सुनंदा कोळेकर, निवृत्ती पाटील व त्यांचा मुलगा निरंजन पाटील हे तिघेही घोट गाव पिंपळपाडा येथील चाळीसाठी बोअरवेलच्या पाइपलाइनचे काम करून घेत असताना त्यांचा मोठा भाऊ बाळाराम पाटील हा मनोज आणि नितीन या दोन मुलांसह कोयता घेऊन तेथे गेला. त्यानंतर त्याने बोअरवेलच्या पाइपलाइनचे काम करायचे नाही, असे सांगत बहीण सुनंदा व भाऊ निवृत्ती यांच्यासोबत भांडण सुरू केले. मनोज पाटील याने निवृत्तीच्या डोक्यावर व गळ्यावर कोयत्याने वार केले. त्यामुळे निवृत्ती पाटील हा जागेवरच मरण पावल्यानंतर तिघा बापलेकांनी पलायन केले. या घटनेनंतर जखमी बहीण सुनंदा कोळेकर हिने तळोजा पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन निवृत्ती पाटील याचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेनंतर बाळाराम पाटील व त्याची दोन मुले मनोज आणि नितीन फरार झाले असून अद्याप ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.