मुंबई
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून ऑनलाईन सातबार, ई-फेरफार मिळवण्याचा प्रयोगाला मिळणार चांगला प्रतिसाद पाहता आता शासनाने आता संपूर्ण तलाठी विभागाची कामेही ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत तलाठ्याकडे येणारे सर्व 1 ते 21 नमुन्यांची सुविधा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गावातील तसेच गाव सोडून कामानिमित्त शहरात राहणाऱ्या नागरिकांना कोणताही तलाठी मार्फत मिळणार अर्ज, माहिती ऑनलाईन मिळवता येणार आहे.
महसूल विभागात सर्वात महत्वाचा दुवा व थेट लोकांशी संपर्क असलेला घटक म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते. तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या २१ नमुन्यांची माहिती ठेवण्यात आलेले असतात. यामध्ये गाव नमुना क्रमांक एक ते २१ असतात. त्यापैकी सातबारा, आठ अ आणि फेरफार उतारे यांचा संबंध हा नागरिकांशी येत असतो. सातबारापैकी सात क्रमांकाचा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा असतो, तर बारा नंबरचा उतारा हा पिकांसंबंधीचा असतो. गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, कब्जेदाराचे नाव, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्रफळ, हक्क आदी तपशील देण्यात आलेला असतो. नमुना बारामध्ये पिकाखालील क्षेत्रफळाची माहिती दिलेली असते. ८ अ या उताऱ्यामध्ये एका व्यक्तीच्या असलेल्या गटांची माहिती असते. जमिनीच्या खरेदी विक्री झाल्यानंतर त्याप्रमाणे फेरफार उताऱ्यामध्ये नोंदी केल्या जात असतात. ही सर्व माहिती आजवर हस्तलिखित असल्याने त्यामध्ये असंख्य मानवी चुका झाल्या होत्या. तसेच साधी शेतसा-याची नोंद करण्यासाठी देखील लोकांना तलाठी ऑफीसमध्ये हेलपाटे मारावे लागतात. यासाठी अनेक वेळा शंभर रुपयाच्या कामासाठी दोनशे रुपये खर्च करावा लागतो.