अहमदनगर
पारनेर तालुक्यातील वडझिरे इथे रात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. पण मोठ्या शहरात अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर पोलीस या संपूर्ण प्रकरणात तपास करत आहेत.
पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात एका तरुणाने स्वतः कडील पिस्तुल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्याने एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या हाताच्या पंजाला दुसरी मानेला तर तिसरी गोळी कानाजवळ लागली. आरडाओरडा केल्यानंतर जमाव जमला.
गोळीबारानंतर ते दोघे तरूण पळून गेले. महिलेच्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमा झाले. त्यांनी सविता यांना रूग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सविता गायकवाड यांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर मोठा जमाव जमला होता. रूग्णवाहिका थेट पोलीस ठाण्यात नेण्यासाठी जमाव आग्रह धरीत होता. मात्र, चालकाने तिथेच मृतदेह उतरवून घेण्यास सांगितल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यांनी आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना केले आहे. गायकवाड यांच्या मुलीने एका व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.