अहमदनगर
‘पैलवान’ या शब्दावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अहमदनगरमधील बोधेगाव येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागली. पंतप्रधान, गृहमंत्र्यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. माझ्या नावाचा जप करत आहेत. त्यांना मी झोपेत सुद्धा दिसतो, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यभरात सभा घेत आहेत. गेल्या काही सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडणार्या शरद पवार यांनी सोमवारी बोधेगाव (शेवगाव) येथील प्रचारसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केलं. ‘पंतप्रधान, गृहमंत्री यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. ही गोष्ट चांगली आहे. शरद पवार, शरद पवार आणि शरद पवार, असा माझ्या नावाचा जप केला जातोय. मी सत्तेत नसतानाही ते दोघेही माझ्यावर टीका करतात. त्यांना झोपेतही मीच दिसतो,’ अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.